गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा, पालिकेच्या माहितीपुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना आटोक्यात आला असला तरी तिसऱया लाटेचा इशारा आणि अनेक निर्बंध शिथिल केल्यामुळे गर्दी वाढल्याने धोका टाळण्यासाठी कोरोना खबरदारीचे नियम पाळूनच गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. यासाठी घरगुती बाप्पा आणि सार्वजनिक मंडळांसह भाविकांनाही संपूर्ण गणेशोत्सवात उपयुक्त ठरणारी माहितीपुस्तिका आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.

पालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने ‘श्री गणेशोत्सव – 2021 माहितीपुस्तिका’ तयार करण्यात आली आहे. या वर्षीच्या माहितीपुस्तिकेत सर्वसाधारण माहिती, मंडप परवानगीच्या अर्जाचा नमुना, सर्वसमावेशक सुधारित मार्गदर्शक सूचना, राज्य शासनाच्या गृह विभागाकडून काढण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना, जाहिराती प्रदर्शित करण्याबाबतचे निकष, विभागीय नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक, नैसर्गिक आणि कृत्रिम नैसर्गिक स्थळांची माहिती, आगमन-विसर्जनावेळीची नियमावली, समुद्राच्या भरती ओहोटीच्या वेळा अशी समग्र माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. ही माहितीपुस्तिका पालिकेच्या ‘एसीजीएम’ या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. या माहितीपुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आदी मान्यवर उपस्थित होते.