पालिकेच्या उद्यानात ऐतिहासिक तोफा, बच्चे कंपनीसह पर्यटकांचे आकर्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या घाटकोपर येथील ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये तब्बल 167 वर्षे जुन्या ऐतिहासिक तोफा आढळल्या असून पुरातन वास्तू  अभियंता खात्याकडून त्यांचे जतन करण्यात आले आहे. या तोफांमुळे बच्चे कंपनीसह पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. पालिकेच्या दोन उद्यानांमध्ये या तोफा लावण्यात आल्या आहेत.

घाटकोपरच्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये काही वर्षांपूर्वी या तोफा आढळून आल्या होत्या. त्यांचे जतन केल्यानंतर घाटकोपर पश्चिमेला असणारे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार उद्यान आणि घाटकोपर पूर्वेला असणारे ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ या उद्यानांमध्ये या तोफा पुनर्स्थापित करण्यात आल्या आहेत. या तोफा आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरत असून अनेक नागरिक तोफांसोबत ‘सेल्फी’देखील आवर्जून घेत आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. या तोफांना पुनर्स्थापित करताना किल्ल्यांच्या बुरुजाशी साधर्म्य साधणारे चबुतरे तयार करण्यात आले असून त्यावर या तोफा बसविण्यात आल्याचे पुरातन वास्तू जतन अभियंता खात्याचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी सांगितले.

‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील 1856 ची नोंद

‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील या दोन्ही तोफांची लांबी 3.10 मीटर असून तोफांचा घेर हा 0.64 मीटर आणि बाहेरील चाकांचा घेर 1.17 मीटर इतका आहे. या दोन्ही तोफांवर सन 1856 या वर्षाची नोंद असून एका बाजूला रोमन लिपी मध्ये ‘एनसीपीसी’ अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत, असेही ते म्हणाले.

उद्यान विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या घाटकोपर पूर्व परिसरातील ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ हे सन 1971 पासून मुंबईकरांच्या सेवेत  असणारे उद्यान आहे. 55 हजार 843 चौरस फुटांच्या जागेत विकसित असलेल्या या उद्यानात असणाऱ्या हिरवाईसोबतच ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील दोन तोफादेखील या आकर्षणाचा पेंद्रबिंदू आहेत.