राणीच्या बागेत होणार सिंहगर्जना!

817

इस्रायली झेब्रांच्या बदल्यात गुजरातचे सिंह मिळणार

पालिकेचे टेंडर निघाले, तीन महिन्यांत कार्यवाही   

भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात लवकरच सिंहगर्जना होणार आहे. गुजरात जुनागडच्या साखरबाग प्राणिसंग्रहालायातून सिंहाच्या दोन जोडय़ा आणल्या जाणार असून या बदल्यात पालिका दोन इस्रायली झेब्राच्या जोडय़ा ‘साखरबाग’ला देणार आहे. परदेशातून झेब्रा आणण्यासाठी पालिकेने टेंडर काढले असून येत्या दोन ते तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

पालिकेच्या वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानात गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या विकासकामांमुळे कायापालट झाला आहे. या ठिकाणी लवकरच वाघ, सिंह, झेब्रा, चित्ता, जिराफ, चिंपाझी, शहामृग, इमू, कांगारू असे देशी-विदेशी प्राणी-पक्षी आणले जाणार आहेत. यामध्ये नव्या प्राण्यांसाठी पिंजरे बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. यात मुंबईकरांना प्रतीक्षा असलेले सिंह लवकरच राणी बागेत पाहायला मिळणार आहेत. गुजरातमधून सिंहाचे दोन नर आणि दोन माद्या आणल्या जाणार आहेत. या बदल्यात दोन झेब्राच्या जोडय़ा द्याव्या लागतील. मात्र फक्त परदेशात मिळणारे झेब्रा आणण्यासाठी पालिकेकडे स्वतःची यंत्रणा नाही. त्यामुळे इस्रायल किंवा परदेशात आढळणारे झेब्रा राणी बागेत आणण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. हे झेब्रा राणी बागेला मिळाल्यानंतर प्रशासन हे झेब्रा साखरबाग प्राणिसंग्रहालयात स्वतः देईल.

 ‘मफतलाल’च्या जागेवर आणखी विस्तार होणार

राणीबाग नूतनीकरण क  सुशोभीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. पेंग्किन आणल्यानंतर राणीबागेतील गर्दी आणखीनच काढली आहे.  यातच राणीबागेला लागून असलेल्या मफतलाल मिलची जागा पालिकेच्या ताब्यात आल्याने या ठिकाणी देशी-विदेशी प्राण्यांसाठी आणखी जागा उपलब्ध होणार आहे. या विस्तारित प्राणिसंग्रहालयाचा आराखडा केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.  मफतलालची 27 हजार 284.36 चौरस मीटर जागा पालिकेला मिळाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या