मुंबईचा ‘ऑक्सिजन’ वळवणाऱया पुरवठादाराला पालिकेची नोटीस; सात दिवसांत साठा परत करण्याचे निर्देश

bmc-2

मुंबई महानगरपालिकेसाठी असणाऱया ऑक्सिजन पुरवठय़ाचा साठा इतरत्र वळवणाऱया पुरवठादार कंपनीला पालिकेने नोटीस बजावली आहे. शिवाय अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त, कोकण आयुक्तांना याबाबत पत्र देण्यात आले आहे. तसेच मुंबईच्या वाटय़ाचा इतर ठिकाणी दिलेला साठा सात दिवसांच्या आत परत करावा, असे निर्देशही नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.

ऑक्सिजनची मागणी आणि रुग्णसंख्येनुसार निश्चित करण्यात आलेल्या कोटय़ानुसार मुंबईसाठी 234 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होतो. तीन ठिकाणच्या उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करण्यात येणारा प्राणवायू सतरामदास गॅसेस कंपनीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला  मिळतो. पालिका हा साठा आपली रुग्णालये, जम्बो कोरोना सेंटर्सना पुरवते. दरम्यान,  मुंबईत गेल्या काही दिवसांपूर्वी ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्याची वेळ आली होती. पालिकेच्या सतर्कतेमुळे रुग्णांचे जीव वाचले. असे असताना पुरवठादाराने मुंबई महानगरपालिकेच्या वाटय़ाचा काही पुरवठा ठाणे, नवी मुंबई महानगपालिकेकडे वळवल्याचा प्रकार समोर आला होता.

पुरवठय़ावर विशेष पथकांची नजर ठेवा

मुंबईला पुरवठा होणारा ऑक्सिजन पूर्ण मिळावा यासाठी पुरवठय़ावर नजर ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या पथकांची रबाळे येथील सतरामदास गॅसेस कंपनी परिसरात नेमणूक करावी, अशी विनंती पालिकेने अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त, कोकण विभागीय आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या