
जागतिक वारसा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पालिका मुख्यालय परिसराचे रुपडे लवकरच पालटणार आहे. या भागातील फुटपाथ रचनेत आकर्षक आणि सुरक्षेच्या दृष्टीने बदल करण्यात येणार आहेत. यामुळे पादचाऱयांना रहदारीसाठी सुलभ आणि प्रशस्त जागा मिळणार आहे. आजपासून सुरू झालेले हे काम आठवडाभरात पूर्ण केले जाणार आहे.
पालिका मुख्यालय परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात दररोज लाखोच्या संख्येने मुंबईकर येत असतात. यामध्ये देशीविदेशी पर्यटकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला आणि गर्दीचा असतो. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना या परिसरातून ये-जा करताना काही वेळा गैरसोयीचेही ठरते.
या पार्श्वभूमीवर प्रवाशांना या ठिकाणच्या फुटपाथवरून सुलभरीत्या ये-जा करता यावी यासाठी फुटपाथ रचनेत प्रायोगिक तत्त्वावर आकर्षक बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये परिसरातील रस्त्यांच्या ज्या जागांचा वापर वाहतुकीसाठी अत्यल्प प्रमाणात होतो अशा जागा प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पादचाऱयांना रस्ता ओलांडणे सुलभ व्हावे यासाठी ठिकठिकाणी विस्तीर्ण ‘झेब्रा क्रॉसिंग’देखील करण्यात येणार आहेत. यामुळे पादचाऱयांना सुरक्षितपणे क सुलभतेने चालण्यासाठी अधिक जागा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही. शिवाय या प्रायोगिक प्रकल्पात केल्या जाणाऱया सुधारणा भविष्यात काही बदल करावयाच्या दृष्टीनेच केल्या जाणार असल्यामुळे आवश्यकता भासल्यास सहजरीत्या बदल करणे शक्य होणार आहे.
– न्यूयॉर्कच्या शहर वाहतूक विभागाच्या माजी आयुक्त व ‘ब्लूमबर्ग असोसिएटस्’च्या प्राचार्या जेनेट सादिक-खान यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये मुंबई शहराला भेट दिली होती. त्यांच्या भेटीदरम्यान या प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर पालिकेने ‘ग्लोबल स्ट्रीट डिझाईन गाइड’ स्वीकारले होते. त्याअंतर्गत असणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम सुरू करण्यात आले आहे.
– पालिकेच्या पुढाकाराने व ‘ब्लूमबर्ग फिलॅन्ट्रॉफिज इनिशिएटिक्ह’ यांच्या सहकार्याने पालिका क्षेत्रात 2015 पासून विविध सुधारणा राबविल्या जात आहेत. यामध्ये विविध जनजागृती अभियानांसह रस्ते व पदपथ दुरुस्ती, अभ्यासपूर्ण अभियांत्रिकी सुधारणांचा समावेश आहे. याच सुधारणांतर्गत आता ‘मुंबई ट्राफिक कंट्रोल ब्रँच’ आणि ‘सिटी ट्रान्सपोर्टेशन ऑफीशियल्स ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह’ यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवला जाणार आहे.

























































