
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत 26 जुलै 2005 च्या महाप्रलयापेक्षा या वर्षी दोन दिवसांत जास्त पाऊस पडूनही पालिकेने सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्यामुळे मुंबईकरांवरील पुराचा धोका टळला. 2005 मध्ये 26 आणि 27 जुलै रोजी तब्बल 944 मिमी पाऊस पडला होता, तर 1 आणि 2 जुलै 2019 या दोन दिवसांत 982.2 मिमी पाऊस पडला. मात्र पालिकेने जागतिक दर्जाची आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवल्यामुळेच मुंबईकरांना दिलासा मिळाला.
वर्षभराची नालेसफाई कामी आली
पालिकेकडून आता मुंबईभरातील नालेसफाई तीन टप्प्यांत वर्षभर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी पालिकेकडून 154 कोटी रुपये खर्च केला जात आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 1 एप्रिल ते 31 मेपर्यंत 70 टक्के, 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत या दुसऱया टप्प्यात 15 टक्के काम तर 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 2020 पर्यंत तिसऱया टप्प्यात उर्करित 15 टक्के काम केले जाते. 31 मेपर्यंत ही वर्षभराची नालेसफाई पूर्ण केली जाते. शिवाय नाले रुंदीकरण व खोलीकरण केले जात असल्यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होण्यास मदत होत आहे. शहर विभागात तर दोन रोबोटच्या सहाय्याने अत्याधुनिक पद्धतीने नालेसफाई सुरू आहे.
पर्जन्यजल वाहिन्यांची क्षमता झाली दुप्पट
मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी अजूनही ब्रिटिशकालीन पर्जन्यजल वाहिन्यांची व्यवस्था आहे. या पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमता 25 एमएम इतकी आहे. मात्र या सर्व पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमता थेट दुप्पट करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी कामही पूर्ण झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता दुपटीने वाढली आहे.
कार्यान्वित झालेले पम्पिंग स्टेशन्स व खर्च
हाजी अली पम्पिंग स्टेशन – 100 कोटी
इर्ला पम्पिंग स्टेशन, पार्ले – 90 कोटी
लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन, वरळी – 102 कोटी
क्लिव्हलँड बंदर पम्पिंग स्टेशन- 116 कोटी
ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन, हिंदमाता- 120 कोटी
गझदर पंपिंग स्टेशन, सांताक्रुझ – 125 कोटी


























































