
सामना प्रतिनिधी । मुंबई
येत्या शुक्रवारपासून सलग तीन दिवस होणाऱया अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी पालिकेने जय्यत तयारी केली आहे. नालेसफाईची पावसाळापूर्वीची कामे पूर्ण झाली असून रस्त्यांची कामांवरूनही शेवटचा हात फिरवण्याची कामे पूर्ण होत आली आहेत. मेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबू नये म्हणून मेट्रोच्या साइटवर पाणी उपसणारे पंप बसवण्यात आले आहेत. दरवर्षी हमखास पाणी भरणाऱया २२५ ठिकाणांपैकी १२० ठिकाणी पाण्याच्या निचऱयासाठी उपाययोजना करण्यात आल्या असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तर रेल्वेचे कल्वर्ट यावेळी खास डिजिटल कॅमेऱयाने साफ केल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.
मुंबईकरांना पावसाळय़ात समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून पावसाळापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी गेल्या रविवारी पालिकेच्या सर्व अधिकाऱयांना ऑन डय़ुटी फिल्डवर राहण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. सर्व विभागातील रस्त्यांची व नाल्यांची सर्व कामे पूर्ण झाली आहेत की नाही हे पाहण्यासाठी आज अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सर्व ठिकाणी जाऊन पाहणी केली. नालेसफाईची कामे १०० टक्के पूर्ण झाली असून रस्त्यांचीही पावसाळापूर्वीची कामे पूर्ण झाली आहेत. तर पाणी भरणाऱया १२० ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती अधिकाऱयांनी दिल्या.
नद्यांवर ट्रान्समीटर
पावसाळय़ात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली की लगेच इशारा देतील असे रडार लेव्हल ट्रान्समीटर नद्यांच्या काठावर बसवण्यात आले आहेत. मिठी, ओशिवरा, पोयसर, दहिसर या नद्यांवर हे ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे मध्यरात्री क्रांतिनगरच्या झोपडपट्टीतील १०० कुटुंबांना स्थलांतर करावे लागले होते. तर दहिसर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बोरिवली आणि दहिसरमधील नॅशनल पार्क परिसरात अक्षरशः पूर आला होता. वाहनेसुद्धा वाहून गेली होती. येत्या पावसाळय़ात अशी परिस्थिती उद्भवल्यास आधीच सूचना मिळावी म्हणून मुंबईतील नद्यांवर ‘रडारलेव्हल ट्रान्समीटर’ बसवण्यात आले आहेत.
नाल्यांची तिसऱयांदा सफाई
दरम्यान, मिठी नदीसहित मोठय़ा व लहान नाल्यांच्या सफाईची कामे पूर्ण झाली असली तरी त्यात पुन्हा कचरा टाकला जात असल्यामुळे दुसऱयांदा आणि काही ठिकाणी तिसऱयांदा नालेसफाईची कामे केली असल्याचा दावा अधिकाऱयांनी केला. पावसाळय़ापूर्वी ६० टक्के नालेसफाई केली जाते. यावेळी काही ठिकाणी ७० टक्के गाळ काढल्याचा दावा अधिकाऱयांनी केला आहे.
मेट्रोच्या कामांच्या ठिकाणी २४० पंप
मेट्रोच्या कामांसाठी मुंबईत सर्वत्र खोदकामे सुरू असून त्यामुळे पाणी तुंबण्याचा धोका ओळखून
एमएमआरडीए आणि एमएमआरसीएलने साइटवर २४० पंप बसवले असल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.



























































