
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादीच्या शिवशक्तीने पैसा आणि शाईच्या खेळाला जोरदार टक्कर दिली. भाजपच्या गड असलेल्या अनेक वॉर्डांमध्ये शिवशक्तीच्या उमेदवारांनी कडवी टक्कर देत विजय मिळवला. महानगरपालिकेच्या निकालानंतर शिवशक्तीचे विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. विजयी झालेल्या काही उमेदवारांनी शिवसेना भवनापर्यंत मिरवणूक काढली. ढोल–ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी विजयाचा गुलाल उधळला. विजयी उमेदवारांनी आपापल्या वॉर्डांत विजयी मिरवणुका काढल्या. शिवसैनिकांनी केलेल्या जयघोषाने मुंबईतील रस्ते दणाणून गेले. मुंबईच्या निकालाने पैसा आणि सत्तेचा पाशवी अहंकार असलेल्यांना जमिनीवर आणले आहे. अनेक मतदारसंघांत गद्दारांची शिवशक्तीने दाणादाण उडवली. गद्दारांच्या उमेदवारांवर शिवशक्तीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. एकीकडे गद्दारांना धडा शिकवताना शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वॉर्डांमध्ये निष्ठावंतांनी मोठय़ा फरकाने विजयश्री मिळवली. बालेकिल्ल्यात आवाज निष्ठावतांचाच आणि त्याचवेळी गद्दारांना नाही थारा, असा संदेश शिवसैनिक आणि मनसैनिकांनी दिला आहे.

विजयानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते गुलाल उधळत जल्लोष करताना.

शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्यानंतर व्हायरल आजींचा जबरदस्त जल्लोष.

शिवसेनेच्या उमेदवार श्रद्धा जाधव वॉर्ड क्रमांक 202मधून प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना 11 हजार 143 मते मिळाली आहेत. हा निकाल मला अपेक्षित होता. माझ्या मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मला हा विजय मिळाला आहे. हा विजय विकासाचा असून मतदारांनी शिवसेनेचा पारंपरिक गड राखला आहे, असे श्रद्धा जाधव म्हणाल्या.

मनसैनिक आणि शिवसैनिकांचा हा विजय आहे. या मतदारसंघात पैसा हरला असून निष्ठा आणि मराठी माणूस जिंकला आहे. हा विजय निष्ठावंत व मराठी जनतेचा आहे. मराठी माणूस हलला नाही, डगमगला नाही, विकला गेला नाही. त्यामुळे हा विजय शक्य झाला आहे, अशी प्रतिक्रिया विजयानंतर मनसेच्या सुप्रिया दळवी यांनी दिली.

वॉर्ड क्रमांक 204मधील शिवसेनेचे उमेदवार किरण तावडे यांनी शिंदे गटाच्या अनिल कोकीळ यांचा दारुण पराभव केला. किरण तावडे यांना 14 हजार 845 मते मिळाली. मुंबईचा राजा पावला… बाप्पाने आशीर्वाद दिला. लालबाग–परळमध्ये गद्दारांना स्थान नाही, हेच मतदारांनी दाखवून दिले आहे, असे किरण तावडे विजयानंतर म्हणाले.

मुंबईतील वॉर्ड क्रमांक 39मधील शिवसेनेच्या उमेदवार पुष्पा कळंबे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवार विनया सावंत यांचा दारुण पराभव केला.

मुंबईतील गोरेगावमधील वॉर्ड क्रमांक 56मधील शिवसेनेच्या उमेदवार लक्ष्मी भाटिया यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजप उमेदवार राजूल देसाई यांचा दारुण पराभव केला. लक्ष्मी भाटिया यांचा 11 हजार 455 मतांनी विजय झाला आहे.

वरळीतील वॉर्ड क्रमांक 196च्या शिवसेनेच्या उमेदवार पद्मजा चेंबूरकर विजयी झाल्यानंतर जल्लोष करताना.

शिवशक्तीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर शिवसेना–मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन येथे जल्लोष केला.

प्रभाग क्रमांक 186च्या शिवसेनेच्या उमेदवार अर्चना शिंदे यांचा दणदणीत विजय झाला.

शिवसेनेच्या उमेदवार हर्षला मोरे यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत एकच जल्लोष केला.

प्रभाग क्रमांक 203मधील शिवसेनेच्या उमेदवार श्रद्धा पेडणेकर यांनी शिंदे गटाच्या समिधा भालेकर यांचा दारुण पराभव केला.



























































