अत्याधुनिक रस्ते, दर्जेदार फुटपाथ; रस्ता सुरक्षेसाठी पालिकेची ‘स्ट्रीट लॅब’

314

वाहतूककोंडीमुळे हैराण होणाऱया मुंबईकरांची सुटका करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षेसाठी पालिका ‘स्ट्रिट लॅब’ सुरू करणार आहे. या उपक्रमात मुंबईतील स्वामी विवेकानंद रोड, नेपियन्सी रोड, विक्रोळी पार्कसाईट मार्ग क्रमांक 17, मौलाना शौकत अली रोड आणि राजाराम मोहन रॉय रोड या पाच रस्त्यांचा समावेश केला आहे. या उपक्रमात रस्त्यांची संरचनात्मक संकल्पना, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित फुटपाथ बनविण्यासाठी डिझाईन तयार करून दर्जेदार रस्ते तयार केले जाणार आहेत.

मुंबईतील वाहतूककोंडी आणि चांगले फुटपाथ बनवण्यासाठी पालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये रस्ते आणि फुटपाथ अधिकाधिक आकर्षक व पादचाऱयांसाठी सुरक्षित असावेत यासाठी मुंबईतील नगररचनाकारांना आपल्या डिझाईन सादर करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमात रस्ते आणि फुटपाथच्या सुधारणांसोबत वाहनांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी काम केले जाणार असल्याचे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी www.msl.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जागतिक संस्थांशी भागीदारी
या प्रकल्पात जागतिक संसाधन संस्था व पालिकेची भागीदारी राहणार आहे. मुंबईकरांना डोळ्यांसमोर ठेवून रस्ते व फुटपाथची डिझाईन्स बनवायची असून यामध्ये भाग घेणाऱया नगररचनाकारांनी जास्तीत जास्त दोन रस्त्यांचे डिझाईन्स 22 ऑक्टोबरपर्यंत पालिकेला पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यातील उत्पृष्ट डिझाईन निवडली जाणार आहेत. अंतिम फेरीत निवडलेल्या सर्वेत्पृष्ट डिझाईनसाठी पाच लाखांचे पारितोषिक देण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या