
मुंबईतील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी जम्बो कोरोना केंद्रे, पालिकेची कोरोना रुग्णालये उभारली गेली असताना आता ताडदेवच्या बने पंपाऊंडमधील पालिका शाळेत पहिले कोरोना केंद्र उभारण्यात आले आहे. अशा प्रकारे पालिका शाळेत उभारण्यात आलेले हे मुंबईतील पहिलेच कोरोना केंद्र असून यात कोरोना रुग्णांसाठी 100 बेड्स, ऑक्सिजन पुरवठा, एक्स-रे यासह अनेक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पालिका, समाजसेवी संस्था, ट्रस्ट, मंडळांच्या सहाय्याने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पालिका कार्यरत होती. त्या दृष्टीने मुंबई सेंट्रल येथील बने पंपाऊंडमधील तीन मजली पालिका शाळेची निवड करण्यात आली असून लक्षणे नसलेल्या, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी हे केंद्र खूपच लाभदायक ठरणार आहे. परिसरातील छोटय़ा घरांमध्ये राहणाऱया रुग्णांना इथे ठेवण्यात येणार असून या केंद्राचा विशेष फायदा होणार आहे. हे केंद्र अल्पावधीतच उभारण्यात आले असून त्यामुळे इतर कोरोना केंद्रांवरील ताणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. पालिकेसह ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना शाखा 215 या केंद्राचे व्यवस्थापन करणार आहे.
स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार
जीवन ज्योत ड्रग बँक या स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पुढाकाराने केंद्र उभारण्यात आले आहे. त्यासाठी विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी सक्रिय सहभाग घेतला आहे. मुंबई जैन संघ संघटन आणि जेम आणि ज्वेलरी नॅशनल रिलीफ फाऊंडेशन या संस्थांचे विशेष सहकार्य लाभले. वीर फाऊंडेशन ऑक्सिजनचा मोफत पुरवठा करणार आहे.
या आहेत सुविधा
ताडदेवमधील म्युनिसिपल शाळा, बने पंपाऊंडमध्ये 100 बेड्स, ऑक्सिजन पुरवठा, एक्स-रेसह इतर सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. छातीत साचलेला कफ बाहेर पडावा म्हणून वाफ घेण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे.
प्रशिक्षित डॉक्टर, नर्स आदींची नियुक्ती केली आहे. वेळेत जेवण-खाण्याची सुविधा असेल.
इथे सेवा बजावणाऱया डॉक्टर, नर्स, कर्मचाऱयांसाठीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
रुग्णांना आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्थादेखील केली आहे.
































































