पालिका शाळांच्या रिकाम्या वर्गखोल्यांचे करायचे काय? पालिका प्रशासनासमोर पेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc

मुंबई महापालिकेने अनेक भागांत शाळा चालवण्यासाठी भाडय़ाने घेतलेल्या जागा सध्या रिकाम्या असून त्या जागांचे करायचे काय, असा पेच पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने अनेक वर्गखोल्या बंद आहेत. विद्यार्थ्यांअभावी रिकाम्याअसलेल्या या जागा मूळ मालकाला परत करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाच्या विचाराधीन होता. पण या जागा मूळ मालकाला परत केल्या तर पालिकेला गरज असताना त्या पुन्हा मिळतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या जागा परत न करता त्यांचा वापर करावा. मात्र, भाडय़ाच्या एकूण जागा किती, त्यातील वापरात किती आणि बंद स्थितीत किती, त्यांचा एकूण भुर्दंड किती पडतो, याची माहिती घेऊन हा निर्णय घ्यावा, असे मत शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी व्यक्त केले. या जागांमध्ये कार्यक्षमता वर्ग, ग्रंथालय सुरू करावे. माजी विद्यार्थ्यांसाठी त्याचा वापर करता येईल. या जागांचा वापर कसा करता येईल, यासाठी समिती स्थापन करावी, अशी सूचना सदस्य साईनाथ दुर्गे यांनी केली. नगरसेविका शीतल म्हात्रे यांनीही बंद जागांच्या भाडय़ाचा भुर्दंड पालिकेला नको, असे मत व्यक्त केले. जागांबाबत एक समिती नेमून त्याचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ, असे प्रशासनातर्फे उपायुक्त (विशेष) आशुतोष सलील यांनी सांगितले.