
सामना ऑनलाईन । मुंबई
पालिकेच्या सहा विशेष समित्यांवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेना उमेदवारांविरोधात एकही अर्ज आला नसल्याने सर्व उमेदवारांची निवड बिनविरोध झाल्याचे महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केले. शिवसेना उमेदवारांना भाजपने आधीच पाठिंबा जाहीर केला होता.
पालिकेची स्थापत्य समिती शहर, स्थापत्य समिती उपनगरे, बाजार व उद्यान समिती, सार्वजनिक आरोग्य समिती, विधी व महसूल समिती आणि महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष-उपाध्यक्षपदांची निवडणूक पार पडली. यावेळी शिवसेनेचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘शिवसेनाप्रमुखांचा विजय असो’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना-भाजप युतीचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी भगवे फेटे, भगवी उपरणी आणि भगव्या झेंडय़ांमुळे पालिकेत भगवे वातावरण तयार झाले. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, आमदार सुनील राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आदी उपस्थित होते.
अध्यक्षपदाचे विजयी उमेदवार
- स्थापत्य समिती शहर – प्रीती पाटणकर
- महसूल व विधी समिती – शीतल म्हात्रे
- सार्वजनिक आरोग्य समिती – अमेय घोले
- महिला व बालकल्याण समिती – हर्षला मोरे
- स्थापत्य समिती उपनगरे – उपेंद्र सावंत
- बाजार व उद्यान समिती – उमेश माने
उपाध्यक्षपदाचे विजयी उमेदवार
- स्थापत्य समिती शहर – दत्ता नरवणकर
- स्थापत्य समिती उपनगरे – दिनेश कुबल
- बाजार व उद्यान – ऋतुजा तारी
- सार्वजनिक आरोग्य – राजराजेश्वरी रेडकर
- विधी समिती – दीपमाला बडे
- महिला व बालकल्याण – उर्मिला पांचाळ























































