
मुंबईत धुळीमुळे वाढणाऱया प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेने खबरदारीची गाइडलाइन जाहीर करूनही दुर्लक्ष करणाऱया प्रकल्पांवर पालिकेने ‘काम बंद’ कारवाई सुरू केली आहे. यामध्ये आतापर्यंत तब्बल 600 बांधकाम प्रकल्पांना ‘काम बंद’ नोटीस बजावण्यात आली आहे, तर संबंधित ठिकाणी पुन्हा बेजबाबदारपणा आढळल्यास ही जागा ‘सील’ करण्यात येईल, असा इशाराही पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मुंबईत सद्यस्थितीत सुमारे सहा हजारांवर बांधकामे सुरू आहेत. या कामांमधून उडणारी धूळ हवेत टिकून राहत असल्यामुळे हवेचा दर्जा खालावत आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. यातच तोंडावर आलेल्या हिवाळय़ात हे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे या बांधकामांना नोटीस बजावून नियमावली पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी 35 फूट उंच पंपाऊंड वॉल, प्रिंक्लर आणि डेब्रिजची वाहतूक बंदिस्तपणे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बांधकामाजवळ वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी, असे निर्देशही देण्यात आलेले आहेत.
मुंबईत 150 टँकरने पाण्याची फवारणी
रस्त्यावरील धूळदेखील प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्यामुळे दररोज 450 किमी रस्त्यांवर टँकरने पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. यासाठी सद्यस्थितीत 24 वॉर्डसाठी सुमारे 150 टँकरच्या माध्यमातून रस्त्यांवर पाण्याची फवारणी करण्यात येत असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
























































