
वांद्रे पश्चिम विभागात प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर बसवून काम करणाऱया 22 बांधकामांचे काम बंद केले आहे. या कारवाईत एच/पश्चिम विभागाकडून एकूण 223 बांधकामांच्या ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये नियम मोडणाऱयांवर कारवाई करण्यात आली असून 202 जणांना नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी ‘वॉर्निंग लेटर’ देण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.
मुंबईत वाढलेल्या प्रदूषणास बांधकामांच्या ठिकाणाहून बाहेर पडणारी धूळ कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या सर्व सहा हजार ठिकाणांना नोटीस बजावून धूळ नियंत्रणाची नियमावली काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले आहेत. हे नियम पाळले जात आहेत का, यावर नजर ठेवण्यासाठी संपूर्ण मुंबईत 24 वॉर्डमध्ये 95 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वांद्रे पश्चिम विभाग कार्यालयाकडूनही विभागात कारवाई करून 22 ठिकाणी बांधकाम थांबवण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. जोपर्यंत प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक सर्व तरतुदी केल्या जात नाहीत तोपर्यंत ही बांधकामे पुन्हा सुरू करता येणार नसल्याचेही प्रशासनाकडून बजावण्यात आला आहे.
धूर सोडणाऱया वाहनांची झाडाझडती!
मुंबईच्या प्रदूषणाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेताच राज्याचा परिवहन विभाग खडबडून जागा झाला असून धूर ओकणाऱया वाहनांबरोबरच वय झालेल्या वाहनांची झाडाझडती घेतली जाणार आहे. त्यासाठी मुंबईत नऊ पथके तैनात केली असून पुढील वीस दिवस वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी दिली.
दिल्लीत 18 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद
नवी दिल्ली ः देशाची अशुद्ध हवेची राजधानी बनलेल्या दिल्लीतील हवेची गुणवत्ता पार ढासळली आहे. दिल्लीतील हवा दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीतील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा 18 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 19 नोव्हेंबरला रविवार आल्याने शाळा 20 नोव्हेंबरला उघडतील.



























































