लग्नात 50 ची मर्यादा, जमले 300 वऱ्हाडी, गर्दी करणाऱया हॉल मालकांचा पालिकेने वाजवला बॅण्ड!

मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागल्याने पालिकेने नियमांच्या कठोर अंमलबजावणीस सुरुवात केली असून कलिनामधील तीन हॉल मालकांवर शुक्रवारी रात्री वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लग्नात फक्त 50 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असताना तीनही हॉलमध्ये 300 पर्यंत वऱहाडी जमले होते. शिवाय सोशल डिस्टन्सिंग पाळणे तर सोडाच, यातील बहुतांशी वऱहाडींनी मास्कही लावले नव्हते.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रुग्णवाढ होत असून गेल्या तीन-चार दिवसांपासून एक हजार रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने प्रत्येक प्रभागात भरारी पथके नेमून लग्न सोहळे, समारंभ, सांस्कृतिक-राजकीय कार्यक्रम आणि गर्दी होणाऱया ठिकाणी धाड टाकली जात आहे. यानुसार शुक्रवारी रात्री सीएसटी रोड कलिना, सांताक्रुझ पूर्व येथील ग्रॅण्ट यशोधन लॉन, गुरूनानक हॉल आणि नूर बँक्वेट हॉल या ठिकाणी धाड टाकली असता तिन्ही ठिकाणी कोरोना खबरदारीचे सर्व नियम मोडून कार्यक्रम सुरू असल्याचे निदर्शनास आले. या प्रत्येक ठिकाणी 200 ते 300 जणांची गर्दी जमा होती. यावेळी पालिकेच्या पथकाने गर्दी कमी करण्यास सांगितले, मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे यशोधन हॉलचे लग्न कार्यालय प्रमुख रफिक हसन शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी गर्दी असलेला कार्यक्रमही बंद करण्यात आला. तर 50 फुटांवरील गुरूनानक हॉलचे शाम खान आणि नूर बँक्वेट हॉलचे लग्न कार्यालयप्रमुख समीर अब्दुल सत्तार फारुक यांना ताब्यात घेऊन वाकोला पोलीस ठाण्यात कारवाईसाठी आणले गेल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. वाकोला पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

मास्कशिवाय फिरणाऱयांविरोधात कारवाई जोरात

z कोरोना रोखण्यासाठी मास्क महत्त्वपूर्ण ठरत असल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
z त्यामुळे पालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून मास्कशिवाय फिरणाऱयांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. पालिकेकडून शुक्रवारी एकाच दिवशी 15 हजार 283 जणांवर कारवाई करून 3056600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
z तर मुंबई पोलिसांनी 4053 जणांवर कारवाई करून 810600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेकडून मास्कशिवाय फिरणाऱया 513 जणांवर कारवाई करण्यात आली असून 102600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
z म्हणजेच एकाच दिवसात 19,849 जणांवर कारवाई करून 39 लाख 69 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या