पालिका देणार इंटरनॅशनल बोर्डाचे शिक्षण, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनॅशनल बोर्डाची किमान एक शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना  सर्वांगीण विकासासाठी शिक्षण दिले जाईल. विशेष म्हणजे आयबी बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषेची शिकवण दिली जाणार  आहे.

राष्ट्रीय स्तरावरील विविध बोर्डाच्या शाळा सुरू केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिका इंटरनॅशनल बोर्डाचे शिक्षण देणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून एक ते दोन शाळा पालिका सुरू करेल. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयबी बोर्ड आणि पालिका अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालिका वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. पालिका आठ माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. यामध्ये 27 मोफत शालेय वस्तूंसह ‘बेस्ट’ बस पासही दिला जात आहे. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एसएससी बोर्ड, सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड, पेंब्रिज बोर्डच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. यामध्ये पालिकेच्या मुलांना जागतिक स्तरावर स्पर्धा करता यावी यासाठी आता इंटरनॅशनल बोर्डाचे शिक्षण देण्यात येणार आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

या बैठकीत पालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, शिक्षण यांची माहितीही आयबी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. या बैठकीला शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सहआयुक्त अजित पुंभार, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, आयबी बोर्डचे स्टिफेन लिआँग, महेश बालकृष्णन, बालकृष्ण शर्मा, शिक्षणाधिकारी राजू तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.