आणखी दोन पूल जमीनदोस्त होणार, परवानगीसाठी पालिकेचे वाहतूक पोलिसांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी धारावी आणि शीव येथील पूर्व-पश्चिम जोडणारे दोन पूल जमीनदोस्त केले जाणार आहेत. यासाठी परवानगी मागत मुंबई महापालिकेने वाहतूक पोलिसांना पत्र लिहिले आहे. मात्र आधी पाडलेल्या पुलांचे काम रखडल्यामुळे शहरात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे या दोन पुलांच्या पाडकामाला परवानगी द्यायची की नाही, असा पेच पोलिसांपुढे निर्माण झाला आहे.

यापूर्वी भायखळा येथील हँकॉक आणि लोअर परळचा पूल पाडण्यात आला, मात्र या पुलांचे काम संथगतीने सुरू आहे. परिणामी वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होऊन त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यात जर धारावी आणि शीव येथील पूल तोडले तर शहरातील वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडेल. पावसाळय़ात या त्रासात मोठी भर पडेल. हे संभाव्य हाल लक्षात घेऊन पूल पाडकामासंदर्भात आम्ही कोणताही हिरवा कंदील दिलेला नाही. यासंबंधी पालिकेच्या अधिवाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

दीड वर्षात नवीन पूल बांधू
धारावी आणि शीव येथील पूल पाडून तेथे दीड वर्षात नवीन पूल उभारला जाईल, असे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र हॅकॉक आणि लोअर परळ पुलाच्या कामाची संथगती पाहता धारावी आणि शीवच्या पुलांबाबत साशंकता वाटत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पोलिसांनी पालिकेने परवानगीसाठी दोन वेळा पत्र पाठवूनही त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

त्या दोन पुलांचे काम लटकले
शीव रेल्वे स्थानक ते धारावीदरम्यानचा भुयारी मार्ग आणि साकीनाका येथील खैरानी रोडवरील नाल्यावरचा पूल पालिकेने धोकादायक ठरवून वाहतुकीसाठी बंद केला आहे. खैरानी रोडवरील नाल्यावरचा पूल तोडण्यात आला आहे. त्याला दोन महिने उलटून गेले आणि आता पावसाळा जवळ आला तरी त्या दोन्ही ठिकाणचे काम सुरू झालेले नाही.