पालिकेचे विद्यार्थी होणार आणखी स्मार्ट, गुगल फिचर आणि विशेष उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्मार्ट क्लास, गुगल फिचर यासारख्या अत्याधुनिक उपक्रमांसह पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढवण्यात येणार आहे.  या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पालिकेच्या 100 शाळांमधील प्रत्येक 20 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिले जणार असल्यामुळे पालिकेचे विद्यार्थी आणखी स्मार्ट बनणार असल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी सांगितले.

पालिकेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी हा नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये युवा अनस्टॉपेबल संस्थेच्या माध्यमातून पालिकेच्या 100 शाळांमधील प्रत्येकी 20 विद्यार्थी निवडले जातील. या उपक्रमासाठी शाळांनी सहकार्य करावे यासाठी नाईक यांनी शिक्षणाधिकारी महेश पालकर यांना पत्र देऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

असा राबवणार उपक्रम

हा उपक्रम राबविण्यासाठी युवा अनस्टॉपेबल संस्थेचे प्रतिनिधी पालिका शाळांमध्ये सर्वेक्षण करून विद्यार्थ्यांची निवड करतील. या उपक्रमात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी आठवडय़ातून दोन वेळा विशेष क्लास घेण्यात येतील. यामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनेही तयार करण्यात येईल, अशी माहितीही अंजली नाईक यांनी दिली.