डुकरांनी लॅपटॉप पळवला, पाठलाग करणाऱ्या नग्न माणसाला पाहून लोकांनी वाजवल्या टाळ्या

1895

जर्मनीतील बर्लिनमध्ये एका महिला फोटोग्राफरने टीपलेल्या फोटोंची ‘द गार्डियन’ सारख्या वर्तमानपत्रांनी देखील दखल घेत बातमी केली आहे. या फोटोमध्ये डुकरांच्या मागे नग्न माणूस पळताना दिसत आहे. अडेल लँडाऊनर नावाच्या महिला फोटोग्राफरने हा मजेशीर प्रसंग तिच्या कॅमेऱ्यात टीपला होता. सोबतच तिने त्या दिवशी काय झालेलं हे देखील सांगितलं.

हा माणूस पश्चिम बर्लिनमधल्या ट्युफेलेसी भागात सुर्यप्रकाशाचा आनंद लुटत खुल्या जागात झोपलेला होता. या भागामध्ये नग्न फिरण्याला कोणतंही बंधन नाहीये. या प्रकाराला तिथे FKK म्हणजेच मुक्त शरीर संस्कृती असं म्हटलं जातं. यामध्ये कपडे न घालता माणसं या जंगलसदृश्य भागात फिरू शकतात. फोटोमध्ये दिसणारा माणूसही ‘मुक्त’ पंथाचा म्हणजेच अंगावर कपडे घालणं न आवडणारा होता. सुर्यप्रकाशाचा आनंद घेत असताना या माणसाचा पिवळ्या पिशवीतील लॅपटॉप डुकरांनी पळवला. आपला लॅपटॉप मिळवण्यासाठी या नग्न माणसाने त्या डुकरांच्या मागे धूम ठोकली.

Die Natur schlägt zurück! Wildschweinjagd am Teufelssee!
In der gelben Tüte ist der Laptop des Mannes, deshalb gab er…

Posted by Adele Landauer on Wednesday, August 5, 2020

पिवळ्या पिशवीत पिझ्झा किंवा खाण्याची गोष्ट असावी असा समज झाल्याने या डुकरांनी पिशवी पळवली होती. ही डुकरं जंगली जुकरं होती. पिशवीत लॅपटॉप असल्याने तो मिळवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार होते, यामुळे त्या माणसाने जन्मल्यानंतर जी अवस्था असते त्या अवस्थेत डुकरांच्या मागे धावायला सुरुवात केली. एका ठिकाणी डुक्कराचा वेग कमी झाला यावेळी या माणसाने हातात काठी घेत जमिनीवर आपटली, तसं डुकराने तोंडातील पिशवी जमिनीवर टाकली. लॅपटॉप घेऊन हा माणूस परत आला तेव्हा तिथे असलेल्या असंख्य माणसांनी टाळ्या वाजवल्या असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. अडेल यांनी तो माणूस परत आल्यानंतर त्याला त्याचे फोटो दाखवले. फोटो पाहून तो माणूस हसला आणि त्याने ते सार्वजनिक करू शकतेस असं तिला सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या