
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात हाहाकार माजला होता. उत्तर प्रदेशात वाराणसी, हरिद्वारसह अनेक ठिकाणी गंगा नदीत कोरोना रुग्णांचे मृतदेह फेकण्याची वेळ आली. बिहारपर्यंत हे मृतदेह वाहून जाताना पाहिले होते. अंत्यविधिसाठी लाकडांची प्रचंड टंचाई झाली. गंगा किनाऱ्यावरील वाळूत अनेक मृतदेह पुरले गेले होते. हे हृदयद्रावक दृश्य अवघ्या देशाने पाहिले. मात्र, आज राज्यसभेत केंद्र सरकारने हात झटकले आहेत. गंगेत किती मृतदेह टाकले? किती आढळले? याबाबत माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर सरकारने दिले आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी कोविड प्रोटोकॉलनुसार मृतदेहांच्या विल्हेवाट संदर्भातील उपाययोजनांची माहिती राज्यसभेत विचारली. गंगा नदीत टाकण्यात आलेल्या कोरोना मृतदेहांची संख्या किती? यावर केंद्रीय कनिष्ठ जलशक्तीमंत्री विश्वेश्वर तुडू म्हणाले, या मृतदेहांच्या अंदाजे संख्येबाबत माहिती उपलब्ध नाही. नदी किंवा काठावर बेपत्ता, अज्ञात जळालेले किंवा अंशत: जळालेले मृतदेह सापडले होते. या घटना उत्तर प्रदेश आणि बिहारमधील जिल्ह्यांमध्ये समोर आल्या होत्या. मंत्रालयाने संबंधित राज्य सरकारांकडे कार्यवाहीचा अहवाल मागवला होता, अशी माहिती मंत्री तुडू यांनी दिली. याचबरोबर उत्तराखंड, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनाही सूचना जारी करण्यात आल्याचे ते म्हणाले. मात्र, केंद्राने उत्तर प्रदेश सरकारला मागविलेला अहवाल आला का? गंगेत किती कोरोना मृतदेह आढळले? यावर तुडू यांनी काहीही सांगितले नाही.
ही तर संसदेची दिशाभूल – काँग्रेस
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किती मृत्यू झाले? यावर जे उत्तर दिले होते तेच आज सरकारने दिले आहे. सरकार संसदेची दिशाभूल करत आहे, अशी टीका काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी केली.
सरकार सत्य लपवत आहे; हा संसदेचा अपमान -तृणमूल
गंगेत कोरोना रुग्णांचे मृतदेह वाहत असल्याचे मीडियात आले आहे. मृतदेह गंगेत फेकण्यात आले होते हे देशाने पाहिले, पण सरकार सत्य लपवत आहे. सरकारचे हे कृत्य लोकशाहीविरोधी असून, हा संसदेचा अपमान आहे, असा संताप तृणमूल काँग्रेसचे नेते सुखेंदू शेखर यांनी व्यक्त केला.























































