शिक्षण करत असताना खेळाला थांबवू नका – सुहास खामकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभियांत्रिकी क्षेत्र हे बुद्धीजीवी लोकांचं क्षेत्र मानलं जातं. त्यामुळे या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इन्फोमॅटिकाचे संस्थापक ‘महेश वाघ’ यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ‘इन्फोत्सव’ आयोजित केला होता. गेली नऊ वर्षे या महोत्सवाचे आयोजन होत असून यंदाचा महोत्सव वीर सावरकर सभागृह दादर येथे जल्लोषात पार पडला. या महोत्सवात उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थांचा मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच टेक गणेशा स्पर्धेच्या विजेत्यांनाही गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पथनाट्य व नृत्याविष्कारांनी या उत्सवाची रंगत वाढली. शिवाय मान्यवरांच्या सादरीकरणामुळे विद्यार्थांचा उत्साहही द्विगुणीत झाला.

विशेष म्हणजे शरीरसौष्ठव पटू सुहास खामकर, चित्रपट निर्माते राकेश राऊत, छायादिग्दर्शक अतुल जगदाळे, अभिनेत्री/गायिका सानिका काशिकर, गायक प्रवीण कोळी व गीतकार योगिता कोळी आदि मान्यवरांच्या उपस्थितीने महोत्सवाची शोभा दुपटीने वाढली. शिवाय मान्यवरांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली.

यावेळी सुहास खामकर यांनी “निश्चित ध्येय गाठायचं असेल तर मेह्नतीबरोबरच सातत्य राखणंही तितकंच आवश्यक आहे. मात्र त्यासाठी वेळेचं योग्य नियोजन करुन जर अपार कष्ट घेतले तर यश नक्कीच मिळतं. शिक्षण करत असताना खेळाला थांबवू नका असा मोलाचा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला.”