बोईंग 737 मॅक्स-8 विमानाचा जगाने घेतला धसका, हिंदुस्थानातही बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

इथोपियामध्ये बोईंग 737 मॅक्स या प्रवासी विमानाला झालेल्या दुर्घटनेनंतर जगभरातील अनेक देशांनी या विमानांचा धसका घेतला आहे. यापार्श्वभूमीवर हिंदुस्थाननेही या विमानांच्या संपू्र्ण सुरक्षा तपासणीचा अहवाल आल्याशिवाय त्यांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे.

गेल्या आठवड्यात इथोपियातील अदीस अबाबा मध्ये बोईंगच्या 737 मैक्स-8 हे प्रवासी विमान कोसळले होते. यात विमानातील सर्व 157 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली. कारण गेल्या 6 महिन्यात बोईंग 737 मॅक्स विमानाला अपघात होण्याची ही दुसरी घटना होती. यामुळे विमानाच्या दर्जाबरोबरच त्याच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उमटले आहे. इथोपिया विमान दुर्घटनेनंतर इंग्लंड,फ्रान्स, जर्मनी,ऑस्ट्रेलिया, सिंगापुर, मलेशिया,आर्यलँड,आईसलँड, ओमान, चीन,इंडोनेशिया दक्षिण कोरिया, अर्जेंटीना या देशांनंतर हिंदुस्थाननेही या विमानाच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. मंगळवारी रात्री उशीरा हिंदुस्थाननेही या विमानांच्या उड्डाणास बंदी घातली. या विमानाच्या सुरक्षेशी संबंधित तपास जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ही बंदी कायम ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. उड्डाण मंत्री सुरेश प्रभु यांनी बुधवारी सर्व एअरलाईन्सची आज बैठक बोलावली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी 2018 ऑक्टेबरमध्ये इंडोनेशियात बोईंग विमानाला अपघात झाला होता. त्यात विमानातील सर्व 189 प्रवासी ठार झाले होते.