
बोईंग 787-8 ड्रीमलायनर हे अमेरिकेच्या बोईंग कमर्शियल एअरप्लेन्सने बनवलेले आधुनिक विमान आहे. हे मध्यम आकाराचे, दोन इंजिनांचे, रुंद-बॉडी असलेले जेट आहे, जे लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी डिझाइन केलेले आहे. 2000 च्या दशकात बोईंग 767 सारख्या जुन्या विमानांना बदलण्यासाठी आणि ते अधिक इंधन-कार्यक्षम बनवण्यासाठी हे तयार करण्यात आले.
प्रवासी क्षमता किती?
एकावेळी 248 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. एकावेळी नॉनस्टॉप 13530 किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते. याचा अर्थ ते दिल्ली ते न्यूयॉर्क किंवा टोकियोसारखे लांब मार्ग सहज कापू शकते.
इंजिनाची कामगिरी
विमानाला दोन इंजिन आहेत – रोल्स-रॉइस ट्रेंट 1000 किंवा जनरल इलेक्ट्रिक जीएनएक्स. ही 60 टक्के कमी आवाज करतात. त्याच्या पंखांचे टोक वरच्या दिशेने वळलेले असल्याने आवाज कमी होतो.
इंधनाची बचत
बोईंग 787-8 हे बोईंग 767 सारख्या विमानांपेक्षा 20-25 टक्के कमी इंधन वापरते. 50 टक्के कमी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करते. त्याची इंजिने 60 टक्के कमी आवाजाची आहेत. त्यामुळे पर्यावरणासाठी अनुकूल आहेत.
वैशिष्ट्ये काय
हलके साहित्य ः ड्रीमलायनर 50 टक्के कार्बन फायबरसारख्या संमिश्र साहित्यापासून बनलेले आहे. त्यामुळे ते हलके आणि मजबूत आहे.
मोठ्या खिडक्या ः ड्रीमलायनरमध्ये मोठ्या खिडक्या (27 बाय 47 सेमी) आहेत.
आराम ः केबिनचा दाब 1,900 मीटर उंची इतकाच राखला जातो, ज्यामुळे 8 टक्के जास्त ऑक्सिजन मिळतो त्यामुळे प्रवाशांचा थकवा कमी होतो.
प्रवाशांसाठी कोणत्या सुविधा
आसन व्यवस्था ः विमान कंपनीनुसार लेआऊट बदलतात. वैयक्तिक टीव्ही, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि पॉवर आऊटलेट आहेत. आरामदायी सीट्स आहेत. सस्पेंशन सिस्टिम चांगला अनुभव देते. जुन्या विमानांपेक्षा कमी आवाज करते.
दिल्ली-न्यूयॉर्क, मुंबई-लंडन मार्गावर…
बोईंगने 2003 मध्ये प्रोजेक्ट 7 ई 7 म्हणून सुरुवात केली, त्याला ‘ड्रीमलायनर’ असे नाव देण्यात आले. पहिले उड्डाण 2009 मध्ये झाले आणि पहिले विमान 2011 मध्ये एएनएला देण्यात आले. नंतर ते जगभरात लोकप्रिय झाले. ड्रीमलायनरचा वापर एअर इंडिया करते. 2012 मध्ये, एअर इंडियाने दक्षिण कॅरोलिना येथून पहिले 787-8 घेतले. ते दिल्ली-न्यूयॉर्क, मुंबई-लंडनसारख्या लांब मार्गांवर उड्डाण करते.