
सामना प्रतिनिधी । जिंतूर
हरयाणा येथून येऊन जिंतूरमध्ये रुग्णांना विविध आजारांवर औषध देऊन त्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या व्ही.के. कौशिक या बोगस डॉक्टरला पोलिसांच्या हवाली केले आहे. जिंतूर शहरातील हनुमान लॉज येथे मागील दीड वर्षापासून डॉ. कौशिका येत होता. तो रुग्णांना विविध आजारांवर औषध म्हणून पेन किलर तसेच स्टेराईडची भूकटी देत असे. संधिवात, गुडघे दुखणे, कंबर दुखी, पाइल्स , मुतखडा, मधुमेह असा आजारांवर आयुर्वेदिक औषध देऊन बरे करण्याचा दावा करून तो रुग्णांच्या जीवाशी खेळत होता. डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून त्याला पोलिसांच्या हवाली केले आहे.
जिंतूर तालुक्यातील जवळपास 500 पेक्षा जास्त रुग्ण कौशिकच्या भूलथापांना बळी पडले आहेत. तो पेन किलर व स्टरोईडचे मिश्रण रुग्णांना देत असे यावेळी तात्पुरत्या स्वरूपात रुग्णांना बरे वाटत असे, परंतु दोन ते तीन महिन्यात रुग्णांच्या चेहऱ्यावर सूज येणे, शरीरात पाणी होणे, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, काच बिंदु, पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढणे यासह किडनीवरही याचे गंभीर परिणाम होत होते. या प्रकरणी जिंतूर येथील जनरल फिजिशियन डॉ. योगेश दहिफळे यांनी संबंधीत रुग्णांसह पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांच्याकडे तक्रार केली. तसेच त्यांनी शहरातील नामांकित हनुमान लॉजवर छापा टाकून डॉ. कौशिक व त्याचा सहकाऱ्याला रंगेहात पकडले. त्याच्याकडील वेगवेगळ्या चिठ्या व औषधी पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी रुग्णांनी तक्रार देण्याचे धाडस केले खरे पण पोलिसांनी तालुका आरोग्य विभागाने तक्रार देण्याचे सूचविले. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती, या प्रकरणी बोगस डॉक्टरवर तातडीने कारवाई न केल्यास तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा डॉक्टर असोसिएशनने दिला आहे. याबाबतचे निवेदन डॉक्टर शिवप्रसाद सानप, डॉक्टर योगेश दहिफळे, डॉक्टर पंडित दराडे, डॉक्टर संतोष घुगे, डॉक्टर विशाल परिहार, डॉक्टर इरफान पटेल यांनी पोलिसांना दिले आहे.

























































