
महानगरपालिकेचे मतदान दोन दिवसांवर आलेले असताना मतदारांना जमिनीचे स्थायी पट्टे देण्याच्या नावाखाली बोगस पट्टे देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला असून भाजपच्या माजी शहराध्यक्षावर याप्रकरणी आरोप करण्यात आला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आजवर विविध प्रलोभने देण्यात आली, मात्र फसवणूक करून मते मिळवण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच बघायला मिळत आहे.
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत प्रचारादरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोळा हजार पट्टे देणार असल्याचे जाहीर करून चंद्रपुरात काही ठिकाणी पट्टय़ांचे वितरण केले. मात्र माजी शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी पट्टे वाटपातही लोकांची फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. महापालिकेच्या नोटिसीवर महापालिकेचा बनावट शिक्का मारून, त्याला लेमिनेट करून लाभार्थ्यांना वितरित करण्याचा प्रकार सुभाष कासनगोट्टूवार यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यासंदर्भात महापालिकेने पोलिसात तक्रार केली आहे.
काँग्रेसची भाजपवर टीका
निवडणुकीत मते मिळवण्यासाठी केलेला हा गंभीर प्रकार म्हणजे मोठा गुन्हा आहे. गरीबांची फसवणूक आहे. त्यामुळे सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर आणि जे कुणी यात सहभागी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखला करून तातडीने कारवाई केली जावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय, तर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.
























































