…तर बोगस लसीकरणातील लाभार्थ्यांच्या ऍण्टीबॉडीज तपासणार; धोका टाळण्यासाठी पालिका सतर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत  सहा ठिकाणी बोगस लसीकरण झाल्याचे समोर आल्यामुळे धोका टाळण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांची प्रतिपिंडे तपासण्याबाबत पालिका नियोजन करीत आहे. या लसीकरणात लाभार्थ्यांना कोणते इंजेक्शन टोचले याबाबत पोलीस आणि पालिकेच्या पातळीवर तपास सुरू आहे. शिवाय अॅण्टीबॉडीजही तपासल्या जाणार आहेत. यात जर सर्वाधिक रुग्णांमध्ये अॅण्टीबॉडीज आढळल्या नाहीत तर लसही बोगस असल्याचे समोर येईल शिवाय त्यांना लस देण्याबाबतही निर्णय घेता येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीसह मुंबईत आणखी पाच ठिकाणी बोगस लसीकरणप्रकरणी गुन्हे नोंदवून आरोपींना अटक केली असली तरी सर्व ठिकाणी लाभार्थ्यांना नेमके काय टोचण्यात आले हा प्रश्न अजून सुटलेला नाही. त्यामुळे लस घेतलेल्यांची अॅण्टीबॉडीज तपासून पाहण्याबाबत  प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. अर्ध्या लाभार्थ्यांमध्ये जरी अॅण्टीबॉडीज आढळले तरी डोस खरा होता असे मानता येईल.

असा होणार तपासणीचा फायदा

लस घेतलेल्यांमध्ये काही दिवसांतच अॅण्टीबॉडीज तयार होतात. ती कोरोनाला आळा घालू शकतात. लस बोगस असल्यास अॅण्टीबॉडीज तयार होणारच नाहीत. त्यामुळे रक्ताच्या चाचणीतून अॅण्टीबॉडीजचे प्रमाण तपासता येणार आहे.