समीर भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर समीर भुजबळ यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर बुधवारी सुनावणी झाली.

याआधी अंमलबजावणी संचालनालने समीर भुजबळ यांच्या जामिनाला विरोध केला होता. मंगळवारी न्यायमूर्ती अजय गडकरी या अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालय आपला निकाल देणार होते. अखेर बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाचा युक्तिवाद संपल्यानंतर समीर भुजबळ यांना जामीन मंजूर करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे ४५(१) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्या आधारावर छगन भुजबळ यांना जामीन देण्यात आला आहे. या रद्द कलमाच्या आधारावर आपल्यालाही जामीन द्यावा अशी विनंती समीर भुजबळ यांनी केली होती. त्यावेळी राज्य सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी कोर्टाला सांगितले की, पीएमएलए कायद्यात २९ मार्च रोजी पुन्हा नव्याने दुरुस्ती करण्यात आली असून त्यामुळे आता समीर भुजबळ यांना जामीन देता येणार नाही, असे म्हटले होते.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यासह इतर अन्य गैरव्यवहारप्रकरणी छगन भुजबळ, त्यांचा पुतण्या समीर यांच्यासह एकूण ५२ जणांना ईडीने मनी लॉण्डरिंग कायद्याअंतर्गत अटक केली होती. त्यातील ५० जणांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. तर छगन भुजबळ यांनाही ५ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आलेले आहे.