अंधांसाठी चलन ओळखणारे ऍप तयार करा, हायकोर्टाचे आरबीआयला आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

चलनातील नोटा ओळखताना अंध व्यक्तींना अनेक अडचणी येतात. अमेरिकेसारख्या प्रगत देशांत या अंधांच्या सोयीसाठी मोबाईल सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदुस्थानातही नेत्रहीनांच्या सोयीसाठी चलन ओळखणारे मोबाईल ऍप तयार करण्याबाबत विचार करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज रिझर्व्ह बँकेला दिले.

नवीन नोटा व नाणे स्पर्शाद्वारे ओळखणे कठीण जात असून या नोटा व नाण्यांमध्ये विशेष खुणा अथवा चिन्हे समाविष्ट करावीत. तसे आदेश आरबीआयला हायकोर्टाने द्यावेत, अशी मागणी करीत नेशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड (नॅब) या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन.एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. अंध व्यक्तींना नोटा ओळखता याव्यात यासाठी 100 आणि त्यापेक्षा अधिक चलनाच्या नोटांवर स्पर्शाने ओळखता येतील अशी चिन्हे यापूर्वीच देण्यात आली आहेत तसेच त्यासाठी लागणारे यंत्र तयार करण्यासाठी निविदाही काढण्यात आली आहे, अशी माहिती आरबीआयच्या वतीने आज कोर्टात देण्यात आली. तेव्हा या नोटा ओळखता याव्यात यासाठी तुम्ही मोबाईल बेस ऑप्लिकेशन का तयार करत नाहीत, अशी विचारणा हायकोर्टाने आरबीआयला केली व या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत सुनावणी चार आठवडय़ांकरिता तहकूब केली.