
पालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार 500 रुपयांचा बोनस जाहीर केल्यानंतर आता बेस्ट कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. यावेळी पालिका प्रशासन, बेस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. सानुग्रह अनुदान उद्या सकाळी महापौर जाहीर करणार आहेत. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड होणार आहे.
मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच ‘बेस्ट’मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बेस्टच्या कर्मचारी युनियनसोबत आज संध्याकाळी सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार सुनील प्रभू, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, बेस्ट व्यवस्थापक सुरेंद्रपुमार बागडे, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, कार्याध्यक्ष अॅड. उदय आमोणकर, सरचिटणीस रंजन चौधरी, उपाध्यक्ष भूपेंद्र नांदोसकर, भास्कर तोरसकर, गणेश शिंदे आदी बैठकीला उपस्थित होते. महापौर किशोरी पेडणेकर महापौर निवासस्थानी उद्या सकाळी बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान जाहीर करणार आहेत.
























































