
>> अमिता कोकाटे
साधारण 15-16 वर्षांपूर्वी एकदा डॉ. महेश केळुसकरांचा पह्न आला, ‘आकाशवाणीसाठी-26 जानेवारी निमित्ताने ‘राष्ट्रीय सर्व भाषा कविसंमेलना’चे आयोजन होत असते. त्यात भारतातील इतर भाषेतील कवींच्या कवितांचे आपल्याकडून मराठीत अनुवाद करून आकाशवाणीवर अनुवादकाकडून सादरीकरण केले जाते. तू करणार का?’ मी अर्थातच ‘हो’ म्हटले; कारण त्यानिमित्ताने इतर भाषेतील कवितेची सहज भेट होतेय-ओळख होतेय, तर हा सुंदर अनुभव कोण नाकारणार?
हा अनुवादाचा सिलसिला पुढे 3-4 वर्षे सुरू राहिला आणि पंजाबी, मल्याळम, कोकणी ह्या इतर भारतीय भाषांतील कविता अनुवादाचा आनंद मिळत राहिला…पुढे काही अपरिहार्य अडचणींमुळे मी हे कंटिन्यू करू शकले नाही, तरी दर 25 जानेवारीला रात्री आकाशवाणी मुंबई केंद्रावरून इतर मराठी कवी मंडळींनी, इतर भाषिक कवितांच्या केलेल्या अनुवादाचा आस्वाद सर्वांबरोबर मीही दरवर्षी घेत होते.
…आणि इतक्या वर्षांनी ह्या एप्रिलमध्ये ‘अनघा प्रकाशन, ठाणे’ यांनी प्रकाशित केलेला व डॉ. महेश केळुसकरांनी संपादित केलेला ‘सर्व भाषा भारतीय कविता दर्शन’ हा देखणा काव्यसंग्रह हातात आला.
मुंबई आकाशवाणी पेंद्रावर 1991 ते 2016 ह्या कालावधीत कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करत असताना, ‘राष्ट्रीय सर्व भाषा कविसंमेलन- मराठी आवृत्तीची निर्मिती करताना डॉ. केळुसकरांनी पाडगावकर, शंकर वैद्य, नायगांवकर, वसंत गुर्जर, गुरुनाथ सामंत यांसारख्या ज्येष्ठ कवींबरोबरच अशोक बागवे, भीमसेन देठे, डॉ. अनुपमा उजगरे, मनोहर रणपिसे, साहेबराव ठाणगे, नलेश पाटील, सौमित्र, नीरजा, सानेकर, मंगेश विश्वासराव, किरण येले इत्यादी मधल्या आणि नव्या पिढीतील सशक्त मराठी कवी-कवयित्रींना ह्या अनुवादांसाठी आकाशवाणीवर निमंत्रित करून प्रजासत्ताक दिनानिमित्ताने 21 भारतीय भाषेतील कवितांचा खजिनाच रसिक श्रोत्यांसमोर खुला केला. इतक्या वर्षात अथक मेहनतीने सादर झालेल्या ह्या कार्यक्रमातील काही वेचक अनुवाद केळुसकरांनी एकत्रित करून ठेवले होते, त्या 21 भारतीय भाषांमधील (व्यक्तिशः केळुसकरांना आवडलेल्या) निवडक 63 अनुवादित कवितांचा हा संग्रह कोविड काळानंतर आपल्या हातात आला आहे.
ह्या संग्रहाच्या निमित्ताने संस्कृतमधील बुध्दचरितापासून जागतिकीकरणाच्या रेटय़ातील मूल्यभानांची उलथापालथ मांडणाऱया मराठी कवितेपर्यंतचा पैस कवेत घेताना, भारताच्या विविध प्रांतातील म्हणजे उत्तर भारतीय, कश्मिरी, डोगरी मैथिली, उर्दू, हिंदी तसेच ईशान्य पूर्वीय-अगदी नेपाळी, असामी, बोडो, उडिया, मणिपुरी, संथाली, बंगाली तर पश्चिम प्रांतीय-पंजाबी, गुजराती, मराठी त्याचप्रमाणे दक्षिण भारतीय-कन्नड, तमीळ, तेलगु, मल्याळम तसेच कोकणी अशा अनेकविध भारतीय भाषिक काव्यपरंपरेचा व त्या काव्याविष्कारातून उमटलेल्या तत्कालीन सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय जाणिवांचा थोडक्यात आढावाही केळुसकरांनी घेतलेला दिसून येतो. हा आढावा म्हणजे संपूर्ण भारतीय कवितेचे दर्शन जरी नसले तरी ह्या संग्रहातील समाविष्ट कवितांद्वारे आपल्याला समकालीन भारतीय कवितेची ओळख मात्र निश्चितच होते, हे विविध बाजांच्या कविता वाचल्यावर लक्षात येते.
संग्रहात विविध भाषिक मूळ कवींचे थोडक्यात परिचय असल्याने, त्यांच्या इतर साहित्यिक योगदानाचीही संक्षिप्त ओळख होऊन वाचक त्यांच्या इतर साहित्याला भेटू शकतो. त्याचबरोबर अनुवादक कवींच्या संक्षिप्त परिचयाने मराठीतील कवी-कवयित्रींच्या सर्जनशील अभिव्यक्तीचीही थोडक्यात ओळख होते.
ह्या संग्रहातील 63 कवितांच्या अभिव्यक्तीच्या भाषा वेगवेगळ्या असल्या व त्या संबंधित क्षेत्रीय परंपरा-अनुभवांचे ठसे दर्शवित असल्या तरी त्यातील काव्यसंवेदन-जाणिवांच्या भाषेत मात्र समान धागा असल्याचे जाणवत राहाते. म्हणूनच भोवतालाशी जोडून घेताना-भोवतालाला समजून घेताना, मल्याळम कवी म्हणतो ‘हेच इवलेसे झाडाचे रोप, भीषण जलप्रवाहात । होणारी जमिनीची धूप, स्वतःच्या मुळांनी बांधून सुरक्षित ठेवेल!…ते वृक्षगान ऐकून । तुझ्या हृदयात सच्चिदानंदाचे कारंजे फुलेल।’…तर काsंकणी कवी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो ‘मग मीच होतो झाड । पसरू लागतात माझी मुळे खोल खोल भूगर्भात । आणि माझे मस्तक उंच आभाळात । …मला समजते त्याची भाषा, मग मीही त्याच्याशी बोलू लागतो जिवाभावाचे.’
मुलांविषयी बोलताना तमीळ कवी म्हणतात, ’मुलं असतात पृथ्वीवरचे पक्षी। आपण लादू नयेत त्यांच्या पंखांवर आपली स्वप्नं’, तर पंजाबी कवितेत हाच स्वर उमटतो तो, ‘हे मुलांचे बागडण्याचे दिवस आहेत । त्यांना ह्या ऋतूत ईश्वर बनू द्या।’ त्याच वेळी ह्याची विपरीत बाजू उलगडताना गुजराती कविता सांगते, ‘जेथे शिशू भाषेआधी शिवी शिकतो…ती माझी गल्ली.’ बाई समजून घेताना-तिचा निर्भीड शब्द कवितेतून मांडताना हिंदी कवयित्री म्हणते, ‘मी बाई आहे, हा माझा अपराध नाही । हो मी बाई आहे ।….तरी पहा तिचं समर्पण । सर्व काही सहन करत । तुमचंच सर्जन करतेय ती । ती जन्म देते तुम्हाला आणि तुम्ही होता विधाता.’ पंजाबी कवयित्री म्हणतात, ‘परस्पर विश्वास आणि विवाह संस्कारांचा । आधारच जर एक अंगठी असेल तर । हे दुष्यंता । मी शपुंतला नाही ।…हतबलतेची साक्ष देणारी । मी शपुंतला नाही.’ आणि मैथिली कविता सांगते, ‘मडक्यात टिपूसभरही पाणी नाही । मी तर आता अश्रुंच्या पाण्यानेच पीठ मळते । खरंच मी रडत नाही.’
निसर्ग आणि मानवाचे नाते, त्यांचे परस्परावलंबित्व-त्याचे बरेवाईट परिणाम ह्याविषयी असामी कविता बोलते, ‘पूर असो वा अवर्षण, दुष्काळ असो वा सुकाळ – दूर हंगामात मी पेरणी करेन । आशेच्या वटवृक्षाची ।’ त्याच वेळी संथाली कविता म्हणते, ‘तोच आहे सर्वात मोठा शत्रू मानवाचा । तरी मनुष्याशिवाय ह्या सृष्टीला नाही काही अर्थ ।….मनुष्य पण असा सुगंधित होतोय आपल्याच । सुविचारांनी, कर्तव्यांनी, हसऱया चेहऱयांनी । जगणं आनंदमयी होत राहतं आणि । त्याचा स्पर्श आभाळाला, उत्तुंग । पृथ्वीचं मन तेव्हा धन्य होत राहतं ।’ तर गंगेची खंत व्यक्त करत मानवी दांभिकतेवर प्रहार करताना उडिया कविता बोलते, ‘जातीय व्यवस्थेची उतरंड भेदून । पोचले होते ब्राह्मणांपासून दलितांपर्यंत । ओतत राहिले । किडामुंग्यांच्या मुखातही । जगवणारी ओल ।’ तर कन्नड कवितेतून कवयित्री सर्वांसाठी शहाणिवेची प्रार्थना करते, ‘पोत्यात बांधलेल्या, विष पसरविणाऱया बियांना । तृणांकुर फुटायच्या आत । तिसरा डोळा उघडा । ….आणि येशू, शिव आणि अल्ला यांच्यातील भेद वितळून जावो ।’
अशा ह्या प्रातिनिधिक सशक्त भारतीय कवितांचे दर्शन घडविणारा ‘सर्व भाषा भारतीय कविता दर्शन’ संग्रह वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. महेश केळुसकर आणि अनघा प्रकाशन यांना मनापासून धन्यवाद.




























































