सयाजीराव महाराजांचा जगप्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. विशाल तायडे

महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील 13 खंडांतील 50 ग्रंथांचे प्रकाशन नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होत आहे. बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे शिक्षण, साहित्य, कला, संगीत, सिंचन, उद्योग, प्रशासन, सामाजिक सुधारणा, राजकीय चळवळ अशा विविध क्षेत्रांतील योगदान वाखाणण्याजोगे आहे. यानिमित्त त्यांनी अनेक वेळा जगप्रवास केला. या अनुभवांवर आधारित ग्रंथ – खंड 15 म्हणजेच सयाजीराव महाराजांचा जगप्रवास.

आधुनिक हिंदुस्थानचे शिल्पकार अशी इतिहासाने नोंद घेतलेले महाराजा म्हणून बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांचे नाव घेतले जाते. आपल्या प्रदीर्घ अशा कारकीर्दीत त्यांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भरीव असे योगदान दिले होते. आपल्या राज्यातील सामान्य माणूस हा त्यांच्या चिंतनाचा कायम विषय राहिला होता. त्याच्या कल्याणासाठी त्यांनी सातत्याने पावले उचलली. शिक्षण, साहित्य, कला, संगीत, सिंचन, उद्योग, प्रशासन, सामाजिक सुधारणा, राजकीय चळवळ अशा विविध क्षेत्रांत महाराजांचे योगदान हे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्यास पुरेसे आहे.

सयाजीराव महाराजांना प्रवासाचीही खूप आवड होती. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत 26 वेळा जगप्रवास केला. या प्रत्येक दौऱ्याचा सविस्तर अहवाल लिहून ठेवण्यात आलेला होता, जो आजही उपलब्ध आहे. या अहवालांवर आधारित सहा ग्रंथांचे (खंड 15) प्रकाशन महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने करण्यात येत आहे. यातील तीन ग्रंथ मराठीत आणि तीन इंग्रजीत आहेत. या ग्रंथांमध्ये महाराजांच्या सर्व 26 परदेश दौऱ्यांचे अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

सन 1875 मध्ये बडोद्याच्या गादीवर विराजमान झाल्यानंतर इ.स. 1887 मध्ये तरुण सयाजीरावांनी आपला पहिला परदेश दौरा केला होता. त्यांचे बहुतांशी दौरे हे आरोग्याच्या कारणाने झालेले असले तरी या सर्व अहवालांचा अभ्यास करता असे लक्षात येते की, त्यांनी या प्रत्येक दौऱ्याकडे एखाद्या अभ्यास दौऱ्यासारखे पाहिले होते. प्रत्येक नव्या ठिकाणी भेट दिल्यावर आपल्याला इथे काय शिकता येईल यावर त्यांचे लक्ष असायचे.
युरोपातील समृद्धी हा तर कायम त्यांच्या उत्सुकतेचा विषय होता. प्रत्येक क्षेत्रात आधुनिकतेची कास धरल्यामुळे युरोपियन समाजाला प्रगती करता आली आणि शिक्षण हा घटक या सर्व प्रक्रियेचा केंद्रबिंदू राहिला आहे हे त्यांनी ओळखले होते. आपल्या राज्यातील पारंपरिक विचारसरणीच्या समाजाला जर प्रगतीपथावर न्यायचे असेल, तर आपल्यालाही समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणायला हवे हे त्यांनी आजपासून दीडशे वर्षांपूर्वी सांगितले होते, हे आजही तितकेच खरे आहे.

खरं तर त्या काळात परदेश दौरा करणे हेच सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानले जात होते. मात्र सयाजीरावांनी चुकीच्या प्रथा-परंपरा नाकारत प्रत्येक क्षेत्रात अभ्यासपूर्ण आणि नियोजनबद्ध रीतीने धोरणे आखली आणि समाजालाही त्या मार्गाने जाण्याची दिशा दिली होती.
जगातील ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी भेट दिली, तेथील उत्तम ते आपल्या राज्यात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बडोदा हे जगभरातील चांगल्या शहरांपैकी एक असावे असा महाराजांचा आग्रह होता. ते जगात पुठेही असले तरी आपल्या राज्याचा विकास हाच कायम त्यांच्या विचार प्रक्रियेचा केंद्रबिंदू होता.

औद्योगिकीकरणातून पाश्चात्त्य देशांचा विकास झालेला आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर बडोद्यातही त्यांनी औद्योगिक विकासाला चालना देण्याचे धोरण अवलंबविले. ‘कलाभवन’सारखे जागतिक दर्जाचे औद्योगिक शिक्षण देणारे केंद्र बडोद्यात उभे केले. त्यासाठी जगभरातील तज्ञांना तेथे पाचारण केले. राज्यातील प्रत्येक जिह्यात उद्योगशाळा सुरू केल्या. त्यातून बडोद्यात औद्योगिकीकरणाची वाढ होत गेली. राज्यातील होतकरू तरुणांना महाराजांनी परदेशातील उत्तमोत्तम शिक्षण संस्थांमध्ये शिष्यवृत्ती देऊन शिक्षणासाठी पाठवले. अशा जागतिक शिक्षण संस्थांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध होते. अशा संस्थांमध्ये ते आवर्जून जात असत आणि तेथील शिक्षण व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करीत असत. जगभरातील विविध विद्यापीठांतील समृद्ध ग्रंथालये पाहून त्यांनी बडोद्यातही ग्रंथालय चळवळ सुरू केली आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाला वाचनाची आवड लागावी यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी ठिकठिकाणी ग्रंथालये सुरू केली.

जागतिक स्तरावर खेळाच्या क्षेत्रात आपला देश मागे आहे हे लक्षात आल्यावर राज्यात खेळांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले. राज्यातील शाळांमध्ये शारीरिक शिक्षण हा विषय अनिवार्य करण्यात आला. सयाजीराव महाराजांना विविध कलांची आवड होती. चित्रकला, शिल्पकला, संगीत, साहित्य इ. कलांना त्यांनी राजाश्रय दिला होता. जगभरातील विविध ठिकाणच्या उत्तमोत्तम कलापृती त्यांनी बडोद्यात आणल्या होत्या. अनेक भाषांतील दर्जेदार पुस्तके गुजराती आणि मराठीत अनुवादित करून घेतली होती. त्यामागे हा जागतिक ज्ञानाचा स्रोत आपल्या राज्यातील नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे ही त्यांची धडपड होती.

आपल्या जगप्रवासातील महाराजांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जागतिक स्तरावरील नेत्यांशी त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते. या संबंधांचा फायदा आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी कसा करून घेता येईल याचा ते नेहमी विचार करीत असत. त्या काळात हिंदुस्थानातील इतर राजा-महाराजांनीही परदेश दौरे केले होते. मात्र सयाजीराव महाराजांच्या जगप्रवासामागील व्यापक दृष्टिकोन हा एका प्रजाहितदक्ष राजाचा होता. या सर्वांचा लेखाजोखा प्रस्तुत ग्रंथांमध्ये मांडण्यात आलेला आहे. प्रत्येक दौऱयामध्ये झालेल्या एपूण खर्चाचा तपशीलही सविस्तरपणे देण्यात आला आहे. या अहवालांमध्ये परदेशातील केवळ घटनांचे वर्णन नसून महाराजांची विचार प्रक्रिया आणि त्यांचा प्रत्येक बाबीकडे बघण्याचा चिकित्सक दृष्टिकोनही वाचकाला दिसून येतो.

या सहा खंडांतील तीन खंड हे मराठीत असून त्यांचे संपादन ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी तर तीन इंग्रजी खंडांचे संपादन डॉ. विशाल तायडे यांनी केलेले आहे. यातील प्रत्येक दौऱ्याच्या अहवालाचे वाचन करताना वाचकालाही आपणही महाराजांसोबत परदेश दौरा केल्याचा आनंद मिळू शकतो, इतके हे अहवाल सविस्तर स्वरूपात आणि ओघवत्या शैलीत लिहिलेले आहेत.