पाऊलखुणांचा मागोवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रणव पाटील

‘सिंधूतील साम्राज्ये’ हे पुस्तक म्हणजे इंग्रजीत गाजलेल्या Empires of the Indus या पुस्तकाचा अनुवाद आहे.

लेखिका ऑलिस ही बरेच वर्ष हिंदस्थानात दिल्ली येथे वास्तव्यास होती. त्यामुळे तिने हिंदी आणि उर्दू भाषांबरोबर हिंदुस्थानी संस्कृतीचा चांगला अभ्यास केला होता. यातून तिला सिंधू नदीच्या उगमापासून ते ती समुद्राला मिळेपर्यंतचा परिसर पाहण्याची व सिंधूकाठच्या अगदी पाषाण काळापासून ते सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्याची कल्पना सुचली. या तिच्या दीर्घ मोहिमेला अनेक संस्थांनी हातभार लावला आणि हा लेखिकेचा प्रवास फक्त प्रवास न राहता प्रचंड ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक गोष्टींच्या अभ्यास, चिंतन आणि प्रत्यक्ष धोकादायक अशा क्षेत्रभेटीचा आयुष्य समृद्ध करणारा अनुभव झाला.

ऑलिसने पुस्तकामधे सिंधूचा प्रवास उलट दिशेने म्हणजे सिंधू जिथे पाकिस्तानात समुद्राला मिळते त्या कराचीपासून ते सिंधूचा उगम असणाऱ्या तिबेटच्या डोंगराळ भागातील अतिशय धोकादायक अतिथंड असणाऱया दऱ्याखोऱ्यातील उगमस्थानापर्यंत केला आहे. तसेच पुस्तकातील मांडणी ही सिंधूकाठच्या संस्कृती आणि इतिहास हा मागून पुढे म्हणजेच आजच्या काळापासून ते पाषाणयुगापर्यंत मांडताना मधे मधे स्वतःचे प्रवासाचे अनुभव दिल्यामुळे पुस्तकाला जिवंतपणा आला आहे.

ऑलिसचा बहुतांश प्रवास हा पाकिस्तानात तर उर्वरित प्रवास हा हिंदुस्थान, तिबेट, अफगाणिस्तान असा आहे. यातील तिच्या पाकिस्तानातील बहुतांश प्रवासामध्ये पाकिस्तानातील लोकजीवनाचा व राजकीय जीवनाचा वेध घेतला आहे ते फारच वाचनीय आहे. कारण शेजारच्या पाकिस्तानातील लोकांच्या स्थितीबद्दल, त्यांच्या गावखेडय़ातील जीवनाबद्दल आणि तिथे राहिलेल्या हिंदूंच्या स्थितीबद्दल आपल्याला विश्वसनीय माहिती फार कमी मिळते. ही माहिती ऑलिसमुळे आपल्यापर्यंत या पुस्तकातून पोहचली आहे.

सुरुवातीचे प्रकरण ‘कराचीतील रमजान’ असे असून कराची शहर, तिथला इतिहास आणि पाकिस्तानातील सध्याची सामाजिक स्थिती यावर ऑलिसने लिहिले आहे. पुढचे  प्रकरण ‘विलक्षण नदीवरचा विजय’ असे असून ब्रिटिशांचा सिंधवरचा विजय यावर हे प्रकरण असून त्यावेळची सिंधची स्थिती यात वाचायला मिळते. तिसरे प्रकरण ‘इथियोपियाचे पहिले फलित’  हे असून सिंधूकाठी असणाऱया सिद्दी या जुन्या हबशी लोकांच्या खेडय़ांना भेट देऊन लेखिकेने त्यांची सामाजिक स्थिती, संस्कृती आणि पाकिस्तानात हे हबशी कसे आले याचा इतिहास दिला आहे. आज साधारण 20 लाख इतकी हबशी लोकांची लोकसंख्या पाकिस्तानात  आहे. ‘सिंधूकाठचे संत’ या प्रकरणात सिंध प्रांतातील सूफी आणि हिंदू संत, त्यांचा इतिहास, त्यांच्या कबरींना भेट देऊन त्यांची संस्कृती व उत्सव यावर लेखिकेने लिहिताना झुलेलालसारखा हिंदू देव आणि त्याला पूजणारे मुसलमान असे अनेक कंगोरे स्पष्ट करताना जुन्या सिंधमध्ये हिंदू-मुस्लिम संस्कृती कशी होती हे स्पष्ट केले आहे.

पाचवे प्रकरण ‘गुरू नानकांचे सैन्य.’ यात शिखांचा इतिहास, यात आज शिखांची पाकिस्तानातील स्थिती व त्यांची धार्मिक स्थळे यांची माहिती आहे.

‘खैबर खिंडीतून वर’ या प्रकरणात हिंदुस्थानात सिंध प्रदेशात झालेले मुस्लिम आक्रमण आणि त्यानंतरचे मुस्लिम राजे हा भाग येतो. ‘रेशीम मार्गावरचा बुद्ध’ या प्रकरणात प्राचीन रेशीम मार्ग असणाऱ्या अफगाणिस्तानमधील व पाकिस्तानातील धोकादायक स्वात खोरे, वजिरीस्तान, गजनी, बामियान, गिलगीट बाल्टिस्तान या भागाचा प्रवास करून जुन्या बौद्ध स्थळांची माहिती व इतिहास सांगताना तिथे सध्या जनजीवन कसे आहे सांगताना अनेक आदिवासी अजूनही पूर्णपणे मुस्लिम न होता आजही जुन्या प्रथा कशा पाळतात हे वाचताना आश्चर्य वाटत राहतं.

‘महासागराच्या सीमेवर सिकंदर’ या प्रकरणात लेखिकेने सिकंदर ज्या ज्या प्रदेशात गेला त्या त्या प्रदेशात, डोंगराळ भागातील खिंडींमध्ये, तालिबानी प्रभाव असणाऱया धोकादायक भागातून प्रवास करत सध्याची स्थिती व सिकंदरच्या पाऊलखुणा याविषयी अतिशय सुंदर लिहिले आहे. ‘इंद्राचे पेय’, ‘गाळ जमिनीखाली गडप झालेली शहरे’, ‘पाषाणयुगातील शिकारी स्त्राr’ या सगळ्या प्रकरणांमधे वैदिक संस्कृती,  सिंधू संस्कृती आणि त्या आदिमानवाच्या पाऊलखुणा असणाऱया ठिकाणांना भेटी देऊन सगळा प्राचीन इतिहास मांडला आहे.

शेवटच्या ‘विलुप्त होत चाललेली नदी’ या प्रकरणात सिंधूच्या उगमापर्यंतच्या प्रवासात चीनने सिंधूवर बांधलेले धरण पाहून लेखिकेला इतके वर्षे सिंधूचा मागोवा घेताना तिचा अडवलेला प्रवाह पाहून तिला प्रचंड धक्का बसला.  ऑलिसने पुस्तकात जागोजागी खोचक प्रश्न विचारून पाकिस्तानी सैनिक असो की मौलवींना या सगळ्यांना हैराण करून सोडले. अनेक ठिकाणी सध्याच्या परिस्थितीवर स्वतःची मते ठामपणे मांडली आहेत.  लेखिकेचा परवानगी न घेता केलेला अफगाणिस्तानातील प्रवास आणि त्यानंतर गुप्तपणे पुन्हा केलेल्या धोकादायक भागातील पाकिस्तानातील प्रवासाचे अनुभव लेखिकेची या विषयाबद्दलची तळमळ तर दिसतेच, परंतु त्याचबरोबर हे अनुभव पुस्तकाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. या सगळ्या प्रकरणांना बरीच मोठी संदर्भ ग्रंथाची यादी आहे. त्यामुळे विषयाचा लेखिकेने केलेला सखोल अभ्यासही यातून दिसतो. आज सिंधूकाठी निर्माण झालेल्या संस्कृतीचे आपण वारस आहोत; परंतु ती नदीच आपल्या देशात नाही यासारखे दुर्दैव नाही. यामुळे हे पुस्तक सगळ्यांनी वाचावे असेच आहे.

सिंधूतील साम्राज्ये – ऑलिस अल्बिनिया

अनुवाद ः श्याम पाठक

प्रकाशक ः Indus source books

मूल्य ः रुपये 499/-