
>> डॉ. पूर्वा अष्टपुत्रे
मंदिरांची निर्मिती करणारे असंख्य शासक महाराष्ट्रात होऊन गेले. राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, देवगिरीचे यादव इत्यादी राजांनी अप्रतिम शिल्पशैलीची उत्कृष्ट मंदिरांची रचना केल्याने महाराष्ट्र, त्यातही विशेषतः मराठवाडा सधन आहे असे म्हटले तर सयुक्तिक होईल. भाविकतेने भक्त आपल्या इच्छित देवतेच्या दर्शनाला जातो. दर्शन घेतल्यावर प्रदक्षिणेसाठी मंदिर परिक्रमा करतो.
वेळ असेल तर मंदिराच्या स्थापत्याचे व बाह्यांगावर असणाऱया असंख्य शिल्पांचे निरीक्षण करतो. स्थपतीने प्रयत्नपूर्वक केलेल्या शिल्प कलाकृतीचे कौतुक करतो. देवी-देवतांबरोबर काही लावण्यवती ललनांचे सौंदर्य पाहून आश्चर्यचकित होतो. मंदिरावर ही उत्तेजक शिल्पे का कोरली असावीत याचे दर्शकांना नवल वाटते, पण आपल्या शिल्पकारांनी जाणीवपूर्वक मानवाच्या भौतिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा विचार करून ही शिल्पे कोरलेली असतात.
सर्वसामान्य लोकांचे कुतुहल शमवण्यासाठी संशोधक या सुंदरींचे निरीक्षण करून त्यामागचा हेतू लोकांसमोर मांडतात. असेच एक संशोधक म्हणजे नांदेडचे प्रा. किरण देशमुख सर. त्यांनी जिद्दीने, चिकाटीने व प्रयत्नपूर्वक अशा सुरसुंदरींचे निरनिराळ्या मंदिरांना भेटी देऊन अभ्यासपूर्वक संशोधन केले. वेळोवेळी ते लेखांद्वारे वाचकांपर्यंत पोचवले. परंतु लेखांचे आयुष्य तात्कालिक असल्यामुळे त्यांनी पुस्तकरूपाने ते संशोधन ‘सुरसुंदरी मनात भरली’ या शीर्षकांतर्गत आपल्यापुढे ठेवले आहे. विविध हेतूंनी निर्मिलेल्या एकूण 14 सुरसुंदरींचे वर्णन 144 पृष्ठांच्या सदर पुस्तकातून आले आहे. ते वर्णन नीरस वाटू नये यासाठी मराठी साहित्यातील संत, तंत आणि भाव काव्याचा चपखल वापर त्यांनी चोखंदळपणे केला आहे. त्यातून त्यांची रसिकता दिसते. आपला विषय मांडण्याची त्यांची सोपी मांडणी आकलनक्षम असल्याने रसिक वाचक सुरसुंदरींचे महत्त्व योग्यरीत्या समजून घेऊ शकतील अशी मला खात्री वाटते. एकाच प्रकारच्या, पण निरनिराळ्या मंदिरातल्या सुरसुंदरींचे फोटो सोबत दिल्याने शिल्पकारांचे वैविध्यपूर्ण कौशल्य कळते. हे विविध फोटो मला या पुस्तकाचे महत्त्वाचे अंग वाटते. शाब्दिक वर्णनाबरोबर दृक्सौंदर्य आनंददायी आहे.
प्रस्तुत पुस्तकात आमच्या अंबरनाथच्या शिवमंदिरातील सुरसुंदरींचा वारंवार उल्लेख आल्याने मला अधिक आत्मीयता वाटते आहे. देशमुख सरांनी आपले संशोधन कार्य असेच निरंतर चालू ठेवावे ही सदिच्छा.
‘सुरसुंदरी मनात भरली’
लेखक – प्रा. किरण देशमुख
प्रकाशक – संगत प्रकाशन. विवेक नगर,
मूल्य – रुपये 220/-




























































