भौतिक जगताचा लेखाजोखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र जाधव

आपल्या आसपासचं जग झपाट्याने बदलत आहे. बदलणाऱया जगाचा परिणाम माणसांच्या दैनंदिन आयुष्यावरसुद्धा होत आहे. या स्पर्धात्मक जगात अनेक उदयोन्मुख कंपन्या स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. कुठलीही परिस्थिती असो या कंपन्यांची वार्षिक उलाढाल काही कोटींच्या घरात असते. आपल्या भोवतालच्या या जगावर डॉक्टर गिरीश वालावलकर यांनी ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून’ या पुस्तकाद्वारे क्ष-किरण टाकला आहे.

डॉक्टर गिरीश वालावलकर यांनी मोठमोठय़ा कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम केले आहे. त्यांनी आसपासच्या जगाचं सूचक पद्धतीने निरीक्षण करून त्यासंदर्भात अनेक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिले. ते लेख एकत्रितरीत्या या पुस्तकात समाविष्ट आहेत. या पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टींचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात असतो. परंतु त्यावर सखोल आणि संशोधनात्मक लेखन वाचून आपल्याला या गोष्टींची नव्याने माहिती मिळते.

सध्या ऑनलाइन विश्वात धुमाकूळ घालणाऱया वेबसीरिजचं विश्व त्यांनी आपल्या लेखातून मांडलं आहे. त्याचबरोबर आजही लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘अमूल’ कंपनीची वाटचाल त्यांनी आपल्या लेखातून स्पष्ट केली आहे. तसेच व्हिडिओ गेम्सची वेगळी दुनिया आणि या क्षेत्रातली व्यावसायिकता त्यांनी उलगडली आहे. त्याचबरोबर ओला, उबरसारख्या टॅक्सी क्षेत्रातल्या कंपनींची व्यवसाय उलाढाल स्पष्ट केली आहे. तसेच हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचं त्यांनी डोळसपणे निरीक्षण केलं आहे. राजकारणामध्ये असलेला उद्योगसमूहांचा प्रभाव यांनी स्पष्ट केला आहे आणि हिंदुस्थानी ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेवर त्यांनी भाष्य केलं आहे.

या पुस्तकातील लेख वाचून लेखकांची आसपासच्या जगाकडे पाहण्याची अभ्यासू मनोवृत्ती दिसून येते. लेखकांनी प्रत्येक गोष्टीमधील सूक्ष्म घटकांचा अभ्यास करून त्यावर आपलं मत मांडलं आहे. ही मतं मांडतांना त्यांनी विशिष्ट कंपनीच्या इतिहासाचा संदर्भ घेऊन त्या कंपनीच्या सध्याच्या नफा-तोटय़ांवर सोप्या भाषेत आकडेवारींच्या आधाराने लेखन केलेले आहे. त्यामुळे हे लेखन वरवरचं न वाटता या लेखांना एक विश्वासार्हता प्राप्त होते. लेखक स्वतः सी.ई.ओ. म्हणून अनेक वर्षे काम करत असल्याने कामानिमित्त त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. त्यामुळे या अनुभवांचा आणि कामाचा पुरेपूर वापर त्यांनी आपल्या लेखांमधून केलेला आहे. त्यांनी अनेक बाबतीत मांडलेली मते विचार करण्यास भाग पाडतात. एका गोष्टीचा अनेक अंगांनी आणि विविध बाजूंनी त्यांनी विचार केला आहे.

सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. तसेच प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर विठ्ठल कामत यांचे शुभाशीर्वाद या पुस्तकाला मिळाले आहेत. आपण रोज जगत असलेल्या जगातील अनेक अज्ञात गोष्टी या पुस्तकामुळे कळून येतात. त्यामुळे ज्यांना या व्यावसायिक क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून संग्रही बाळगण्यासारखं आहे.

सी.ई.ओ.च्या केबिनमधून
लेखक – डॉ. गिरीश वालावलकर
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ- 158, मूल्य – रु. 195