
>> डॉ. विजया वाड
कवी नारायण सुर्वेंचा जीवनपट त्यांची सावली मांडते. आणि तो मांडतानाही स्वतःकडे फक्त पडछायाच ठेवते.
कृष्णाबाई नारायण सुर्वे अनपढ राहिल्या, पण एक अत्यंत सुसंस्कृत जीवन जगल्या. ‘स्वत्व आणि सत्त्व’ यांची वेळोवेळी नशिबाने परीक्षाच पाहिली, पण कृष्णा पास झाली. ‘मास्तरांची सावली’ हे मराठी सारस्वताचे अनमोल लेणे आहे.
‘आयुष्याच्या पावला पावलावर आपल्याला अनुभव मिळत असतात. चांगलेही आणि वाईटही. हे सारे आपण झाकून का ठेवायचे? सगळेच अनुभव आठवणार नाहीत, पण जे आठवतात ते तरी का झाकून ठेवायचे? मन तर हलकं होईल!’ हे कृष्णाबाईंचे विचार प्रत्येकाने मनात साठवावेत.
प्रसिद्धीसोबत ‘वलय’ येते, पैसा येतोच असे नाही. कृष्णाबाईने खूप ‘ऊन’ सोसले, पण ‘सावली’ होऊन ‘मास्तरां’चे अर्थात नारायण सुर्वे यांचे आयुष्य अक्षरशः झेलले. लहानपणीच बाबा गेल्याने आईनेही काजऱयाचे फळ खाऊन जीवन संपविले आणि दोन वर्षांची कृष्णा काकाच्या घरी राहायला गेली. कृष्णा तळेकर मंगलदास चाळीत आपल्या चुलत भावंडांसह मोठी होत होती. कृष्णाचा सांभाळ पोरकी झाल्यावर आजीने मोठय़ा प्रेमाने केला. ही वडिलांची आई! पण लाड इतके की, कृष्णा शाळेत जायचे नाही म्हणाली, तर धाकदपटशा दाखविला नाही आणि कृष्णेची ‘पाटी’ कोरीच राहिली.
नारायण सुर्वे त्याच चाळीतले. हळूहळू प्रेम जमले. आजीचा मृत्यू चटका लावून गेला कृष्णेला. एक आठवण- काकांनी सांगितलेली. चितेवर अग्नी देताना आजीचा उजवा हात बाहेरच राहिला नि देह जळाल्यावर बाहेर फेकला गेला. काकांनी तो घरी आणला आणि हाताचा ठसा करून चांदीचा हात केला आणि तो देवघरात ठेवला. आत्याने मात्र कृष्णेला आजीने ठेवलेले सर्व दागिने आणि जपलेली सारी रोकड हडप केली.
मास्तरांना ‘प्रपोझ’ कृष्णाने केले. ‘तुम्हाला कुणी नाही, मला कुणी नाही. मग आपण एकमेकांचा हात धरला तर बिघडलं कुठे? असं म्हणत कोर्टातलं लग्न. बुधाजी गोडघाटे याने दोन छोटे हार आणले होते. ते एकमेकांस घातले. लोक देवळाच्या पायरीवर डोकं ठेवतात. कृष्णेनं कोटी कोटी प्रणाम कोर्टाच्या पायरीला केले. क्या बात है ना! नारायणच्या मित्राच्या घरी सांताक्रुझला मुक्काम बशिवला. मग काही दिवस दुकानांच्या बाहेरच्या गॅलऱ्यात राती गुजारल्या. दोन वेळच्या जेवणाची विवंचना असताना पहिली दिवाळी आली. अर्धी खोली एव्हाना मिळालेली. मित्रांनी शेवगाठय़ा आणल्या. पण त्यांना चहा द्यायला घरात साखरच नव्हती. वाचताना पोटात तुटत राहते. काही दिवस मशिदीतही काढावे लागले. मास्तर कम्युनिस्ट पार्टीची कामं करीत होते. बाळंतपण परेलला झाले. मैत्रिणीसारखेच नाते असलेल्या नणंदबाईकडे सकल्याकडे ओली बाळंतीण गेली, पण सकल्याकडे जागा छोटी, गरिबी, खायची प्यायची अडचण! मग पुन्हा ती अर्धी खोली. टायफॉईड झालेले ‘मास्तर’ छोटा बाळ रवी अन् ती! सोबतीला अठराविश्वे दारिद्रय़. ओल्या बाळंतिणीची भूक भागत नव्हती. अशा परिस्थितीत कोणीतरी रस्त्यावर उतरवून ठेवलेले अन्न हिने ग्रहण केले. मुलगा रवी अन्नान्नदशेत वाढवायचा होता. गरिबीचे चटके सोसत असताना नवऱयास शाळेत मास्तरची नोकरी लागणे आणि कृष्णाबाईस, शिपाईण म्हणून काम मिळणे हा योग आयुष्यात जुळून आला आणि मग कविता घरात आली!
उकिरडा, फुटपाथ, झोपडी, अर्धी खोली, रुम्स, ब्लॉक नि आयुष्याच्या निवांत वेळेला नेरळचे प्रशस्त घर ज्याला आपली जातही माहीत नव्हती अशा रस्त्यावर पडलेल्या मुलाला कविता हिंदोळय़ावर बसवून गेली. मास्तर राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले आणि त्यांच्या कवितेचा समाजातला दबदबा वाढला. मास्तरांची ही सावली मास्तरांबरोबर कुठे बाहेर जात नसे. कितीक मानसन्मान, पद्मश्री …पण आपल्यामुळे मास्तरांना कमीपणा येऊ नये हीच मनभर सद्भावना!
आता नेरळला राहू लागल्यावर समोरच्या इमारतीत काम करणारे मजूर आणि पाठुंगळी पोर बांधून दगडविटांची घमेली नेणाऱया बाया बघितल्या की कृष्णाबाईला वाटतं, यातून एखादा नारायण सुर्वे निघेल? एखादी कृष्णाबाई निपजेल? घडेल? मग कृष्णाबाई त्यांच्या सुखासाठी देवाजवळ प्रार्थना करतात.
हे पुस्तक लिहून झाल्यावर त्या म्हणतात, ‘‘मास्तर, या माझ्या जीवनकथेमुळे इतिहास घडेल, की वादंग उठेल, मला ठाऊक नाही. फक्त ‘तुंबड’ बाहेर करून ‘मोकळी’ झालेय. यात प्रसिद्धीचा हव्यास नाही. मला मोठं व्हायचंच कुठाय? मी आहे फक्त तुमची सावली.’’
मास्तरांची सावली
लेखिका – कृष्णाबाई नारायण सुर्वे
प्रकाशन – डिंपल प्रकाशन
मूल्य – 180 रुपये, पृष्ठ – 183
शब्दांकन – नेहा किशोर सावंत



























































