राज्यपालांच्या बैठकीत सीमाप्रश्नाचा उल्लेखही नाही, सीमाभागात मराठी आणि कन्नड भाषांमध्ये दिशादर्शक फलक लावण्यावर एकमत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील सामूहिक समस्यांबाबत दोन्ही राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वयक बैठकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सीमाप्रश्नाचा उल्लेखही करण्यात आला. मात्र, दोन्ही राज्यांच्या सीमाभागात मोठय़ा प्रमाणावर मराठी व कन्नड भाषिक सामान्य नागरिक धार्मिक, पर्यटन, रोजगार, आरोग्य व अन्य कारणांसाठी ये-जा करीत असतात. त्यामुळे त्यांना मराठी व कन्नड या दोन्ही भाषांमध्ये दिशादर्शक फलक लावण्याबाबत एकमत झाले.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या जिह्यांच्या आंतरराज्यीय सामाईक प्रश्नांच्या मुद्दय़ांबाबत आज येथील रेसिडेन्सी क्लब येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, तसेच कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही राज्यांची समन्वय बैठक झाली. यावेळी महाराष्ट्राच्या सीमाभागातील पाच व कर्नाटक राज्यातील चार जिह्यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत पूर, गुन्हेगारी, अवैध दारूतस्करी, पाणी नियोजन, तसेच गर्भलिंगनिदान आदींबाबत अधिकाऱयांनी समस्या मांडल्या. यावेळी अनेक सामाईक मुद्दय़ांवर दोन्ही बाजूंनी चर्चा होऊन त्यांतील काही मुद्दय़ांबाबत बैठकीतच एकमताने निर्णय झाले. तर, काही मुद्दय़ांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठरले. राज्यस्तरावरील मुद्दय़ांबाबत दोन्ही राज्यपाल संबंधित राज्य शासनाला ते प्रश्न सोडविण्याबाबत सूचना करणार आहेत. यासाठी प्रस्ताव राजभवनकडे पाठविण्याची सूचना उपस्थित संबंधित अधिकाऱयांना देण्यात आली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, ‘‘महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील सीमेलगतच्या जिह्यांत परस्परांत चांगला समन्वय आहे. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱयांच्या चर्चेतून राज्यस्तरावरून सोडविणे आवश्यक असलेल्या समस्यांबाबत राज्य शासनाला सूचित करण्यात येईल. ही समन्वय बैठक पुढील काळात लाभदायक ठरेल,’’ असेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी या राज्यस्तरीय समन्वय बैठकीबाबत समाधान व्यक्त केले. ‘‘संबंधित स्थानिक प्रशासनाने परस्परांत अधिक चांगला समन्वय निर्माण करून त्या-त्या भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत,’’ असे ते म्हणाले.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 26 जून 2020च्या आंतरराज्य बैठकीत ठरल्याप्रमाणे कृष्णा नदीतील पुराचा प्रभाव कमी करण्यासाठी दरवर्षी 15 ऑगस्टपर्यंत अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 517 ते 517.50 मीटरच्या मर्यादेत राखली जावी. आजरा तालुक्यातील 3.10 टीएमसी क्षमतेचा किटवडे मध्यम प्रकल्प कृष्णा नदी खोऱयातील घटप्रभा उपखोऱयात असून, हा नवीन प्रकल्प दोन्ही राज्यांसाठी फायदेशीर असल्याने परस्पर सहमतीने अटी व शर्तींसह आंतरराज्य प्रकल्प म्हणून पाहिला जाऊ शकतो, अशी माहिती दिली. शिवाय गोवा राज्यातून अवैध दारू वाहतूक होऊ नये यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या उत्पादन शुल्क विभागाने शिनोली, संकेश्वर, कोगनोळीअंतर्गत मार्गांवर एकमेकांशी समन्वय साधणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले.

सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी 2016-17मध्ये महाराष्ट्र राज्याने कर्नाटक राज्यातील दुष्काळी भागासाठी 6.865 टीएमसी पाणी सोडले होते. त्याप्रमाणे कर्नाटक शासनाने महाराष्ट्रातील जत व अक्कलकोट भागासाठी पाणी सोडावे. तसेच कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना सांगली जिह्यात बस स्थानकावर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले जातात. त्याप्रमाणे कर्नाटकनेही सांगलीच्या बसेसना प्लॅटफॉर्म उपलब्ध करू द्यावेत. आरोग्य, उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दोन्ही राज्यांतील पोलिसांनी परस्परांत समन्वय ठेवण्याची मागणीही त्यांनी केली.

सोलापूरचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे म्हणाले, ‘‘जिह्यात 40 साखर कारखान्यांद्वारे मोलॅसिस, तसेच गूळ पावडरची निर्मिती होते. तीन वर्षांत मोलॅसिस वाहतुकीसंदर्भात 24 गुन्हे नोंदले आहेत. तीन वर्षांत सुमारे 703 मेट्रिक टन मोलॅसिसची अवैध दारूसाठी विक्री झाली असून, यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दोन्ही राज्यांतील उत्पादन शुल्क प्राधिकरणांमध्ये समन्वय ठेवून संयुक्तपणे छापेमारीची आवश्यकता आहे.’’

दरम्यान, धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱयांवर कारवाईची मागणी केली. तर, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी वाळू उत्खनन व स्वातंत्र्यसैनिकांच्या नोंदीत समन्वय ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

बेळगावचे जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी कृष्णा आणि प्रमुख नद्यांमध्ये महाराष्ट्रातील धरणांमधून पाणी सोडल्यामुळे पूरस्थितीचे व्यवस्थापन करणे, व्यापाराला चालना देण्यासाठी आंबोली घाटमार्गे बेळगाव आणि महाराष्ट्रादरम्यान दर्जेदार रस्तेजोडणीची गरज आहे. महाराष्ट्रातील शहरांमध्ये माल पोहोचविण्यासाठी बेळगाव येथून मालवाहू वाहनांना विनाअडथळा प्रवेश मिळणे, बेळगावच्या ‘एमएसएमई’ने पुरविलेल्या साहित्यासाठी उद्योगांकडून वेळेवर देणी देणे व दोन्ही राज्यांच्या सीमेपलीकडील गुन्हे, तस्करी, अवैध दारू वाहतूक आणि इतर पोलीस आणि सुरक्षा या समस्यांशी संबंधित माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी दोन्ही बाजूंमधील परस्पर सहकार्य गरजेचे असल्याबाबत सांगितले.