
बोरिवली (पश्चिम) येथील आर. एम. भट्टड मार्गावर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी झाले. अँटी स्किड सर्फेसिंग तंत्रज्ञान वापरून पृष्ठभाग बांधलेल्या या पुलावरून जाणारी वाहने विशेषतः दुचाकी घसरणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
या लोकार्पणप्रसंगी माजी आमदार तथा म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार सुनील राणे, आमदार विलास पोतनीस, आमदार मनिषाताई चौधरी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्ष संध्या दोशी-सक्रे, उपआयुक्त (परिमंडळ 7) डॉ. भाग्यश्री कापसे, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) अशोक मिस्त्री, आर / मध्य विभागाचे सहायक आयुक्त जावेद वकार, विविध माजी नगरसेवक आणि नगरसेविका यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आर. एम. भट्टड मार्गावरील उड्डाणपूल प्रकल्पाची संक्षिप्त माहिती
आर. एम. भट्टड मार्गावर बोरिवली (पश्चिम) मधील लिंक रोड ते फिल्डमार्शल करिअप्पा उड्डाणपुलापर्यंत बांधण्यात आलेला हा उड्डाणपूल प्रामुख्याने लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग म्हणजेच वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या उड्डाणपुलामुळे शामाप्रसाद मुखर्जी चौक, कल्पना चावला चौक, साईबाबा नगर, राजेंद्र नगर आणि जवळपासच्या भागातील वाहतुकीला मदत होणार आहे. स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन आणि कल्पना चावला चौक या दोन महत्त्वाच्या जंक्शनवरुन हा पूल विस्तारित झाला असल्याने वाहतुकीचा वेग तर वाढणार आहेच सोबत प्रवासाच्या वेळेतही बचत होणार आहे.
सुमारे 937 मीटर लांब अंतराच्या या उड्डाणपुलावर पूर्व-पश्चिम आणि पश्चिम-पूर्व या दोन्ही बाजूने प्रत्येकी दोन अशा एकूण चार मार्गिका आहेत. कंपोसिट सेक्शन तंत्रज्ञान वापरून व एक स्तंभ पद्धतीने बांधलेल्या या उड्डाण पुलावर अँटी स्किड सर्फेसिंग तंत्रज्ञान वापरून पृष्ठभाग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पुलावरून जाणारी वाहने विशेषतः दुचाकी घसरणार नाहीत, याची काळजी घेतली गेली आहे.
सदर उड्डाणपुलासाठी 13 हजार 347 घन मीटर काँक्रिट, 2 हजार 900 मेट्रिक टन रिइन्फोर्समेंट स्टील, तर 4 हजार 186 स्ट्रक्चरल स्टील वापरण्यात आले आहे. या प्रकल्पावर सुमारे 173 कोटी रुपये खर्च झाला आहे.
























































