कुस्ती महासंघ ऑलिम्पिक ट्रायल टाळण्याची शक्यता, ऑलिम्पिकला कमी कालावधी उरल्याने घेणार निर्णय

पॅरिस ऑलिम्पिकसाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी उरलेला आहे. वेळ कमी असल्यामुळे राष्ट्रीय कुस्ती महासंघ (डब्लूएफआय) ऑलिम्पिक ट्रायल टाळण्याबद्दल विचार करत आहे. त्यामुळे आगामी महिन्यात होणाऱया मानांकन कुस्ती स्पर्धेसाठी हिंदुस्थानी कुस्तीपटूंना हंगेरीला पाठविण्याचा निर्णय होणार आहे.

अमन (57 किलो) या एकमेव पुरुष कुस्तीपटूसह विनेश पह्गाट (50 किलो), अंतिम पंघाल (53 किलो), निशा (68 किलो) व रीतिका (76 किलो) या पाच महिला कुस्तीपटूंनी हिंदुस्थानसाठी पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळविला आहे. काही कुस्तीपटूंच्या मागणीमुळे व कमी कालावधी असल्याने राष्ट्रीय कुस्ती महासंघही ऑलिम्पिक ट्रायल न घेण्याबाबत विचार करत आहे. ‘डब्लूएफआय’कडून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

वजन कमी करावे की ऑलिम्पिकची तयारी?

हिंदुस्थानला ऑलिम्पिक कोटा मिळवून देणाऱया कुस्तीपटूंना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी ऑलिम्पिक ट्रायलला सामोरे जावे लागत असते. ट्रायलमधील विजेत्या कुस्तीपटूंना ऑलिम्पिकला पाठवले जाणार होते, मात्र ऑलिम्पिक ट्रायलसाठी आता फारसा वेळ उरलेला नाहीये, असे ‘डब्लूएफआय’च्या पदाधिकाऱयांचे म्हणणे आहे. शिवाय अमन व इतर काही कुस्तीपटूंनीही ऑलिम्पिक ट्रायलमध्ये रस दाखवला नाही. ‘वजन कमी करावे की ऑलिम्पिकची तयारी करावी? असा प्रश्न आमच्यापुढे पडलाय’ असे त्यांचे म्हणणे आहे. आताच वजन कमी करण्याच्या नादात ऑलिम्पिकच्या कामगिरीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. ज्या कुस्तीपटूंनी देशासाठी ऑलिम्पिकचा कोटा मिळविला त्यांनाच पॅरिस ऑलिम्पिकला पाठविण्यात यावे, अशी एका महिला कुस्तीपटूने नाव न छापण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली.

…तर रवी कुमारचे स्वप्न भंगणार!

राष्ट्रीय कुस्ती महासंघाने ऑलिम्पिक कोटा मिळविणाऱया सहा कुस्तीपटूंना आगामी महित्यात हंगेरीत होणाऱया जागतिक मानांकन कुस्ती स्पर्धेसाठी पाठविण्याचा निर्णय घेतलाय. या स्पर्धेनंतर अमनला ऑलिम्पिकच्या तयारीसाठी अमेरिकेला, तर पाच महिला कुस्तीपटूंना जपान पाठविण्याची तयारी केलीय, मात्र ऑलिम्पिकसाठी ट्रायल स्पर्धा झाली नाही तर टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या रवी कुमारचे पॅरिस ऑलिम्पिकचे स्वप्न भंगणार आहे.

ऑलिम्पिक ट्रायलची तारीख जाहीर करा!

पॅरिस ऑलिम्पिकसाठी जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी उरलाय, मात्र तरीही अद्यापि ऑलिम्पिक ट्रायरच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. ऑलिम्पिक ट्रायलच्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात, अशी मागणी विनेश पह्गाटने सोशल मीडियावर पोस्ट लिहून केंद्रीय क्रीडा मंत्रालय व हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) यांच्याकडे केली आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी ‘डब्लूएफए’चे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध आंदोलनाचा शड्डू ठोकण्यात आघाडीवर असलेल्या विनेश पह्गाटने महिलांच्या 50 किलो गटात ऑलिम्पिकचा कोटा मिळविलेला आहे. मोठे कुस्तीपटू ट्रायलशिवाय ऑलिम्पिकला जाण्यासाठी प्रयत्नशील असतात, असा आरोप नेहमी होत असतो, मात्र यावेळी स्वतः विनेशनेच ऑलिम्पिक ट्रायलची मागणी करत आपण तयार असल्याचा इशारा दिला आहे.