बॉक्सिंग डे कसोटीसाठी क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये परवानगी मिळणार

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आयपीएल संपल्यानंतर क्रिकेट मालिका रंगणार आहे. दोन देशांमध्ये कसोटी, वन डे आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. कोरोनाचा फटका या मालिकेलाही आतापर्यंत बसलाय. कोरोनाबाधितांची वाढती संख्या, क्वारंटाइनचा कालावधी यामुळे वेळापत्रकालाही विलंब झाला. मात्र या मालिकेला दोन्ही बोर्डांकडून ग्रीन सिग्नल दाखवण्यात आलेला आहे. या मालिकेशी संबंधित एक आनंदाची बातमी मीडियासमोर आली आहे.

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे होणाऱया बॉक्सिंग डे कसोटीसाठी स्टेडियममध्ये क्रिकेटप्रेमींना परवानगी देण्यात येणार आहे. पण किती प्रेक्षकांना एण्ट्री देण्यात येईल याबाबत निश्चितपणे सांगण्यात आलेले नाही.

या आठवडय़ात मेलबर्न येथे घोडय़ांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही शर्यत पाहण्यासाठी काही प्रमाणात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आलेली आहे. याप्रसंगी व्हिक्टोरिया राज्याचे प्रमुख डॅनियल ऍण्डर्यूस म्हणाले, कोरोनावर नियंत्रण मिळवता आले असल्यामुळे स्टेडियममध्ये काही प्रमाणात क्रीडाप्रेमींना परवानगी देण्यात येणार आहे.

मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटीसाठी किती टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येईल हे आताच सांगू शकत नाही. यासाठी योजना तयार केली जात आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी 80 हजारांपेक्षा जास्त क्रिकेटप्रेमींची स्टेडियममध्ये उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या