सामना प्रतिनिधी | कल्याण
पोहण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा डबक्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी पूर्वेकडील एमआयडीसी येथील उघडकीस आली. एमआयडीसीतील पाण्याच्या टाकीच्या बाजूला या मुलाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अनिकेत यादव ( १३ ) असे मृत मुलाचे नाव असून तो डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगर झोपडपट्टीत राहत होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पोहोण्यास जात असल्याचे सांगून अनिकेत घराबाहेर पडला होता. मात्र काही तासानंतर अनिकेत घरी न आल्याने घरच्यांनी आजूबाजूला शोध सुरु केला. दुसऱ्या दिवशी अनिकेतचा भाऊ अजितला एमआयडीसी येथील पाण्याच्या टाकीच्या बाजूला असलेल्या डबक्यात अनिकेतचा मृतदेह तरंगताना आढळून आला. अजितने त्याबाबत तात्काळ घरच्यांना याची माहिती दिली. रामनगर पोलिसांना कळविल्यानंतर अनिकेतचा मृतदेह डबक्यातून बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला.



























































