
अयान मुखर्जी याने दिग्दर्शित केलेल्या बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी लॉन्च झाला. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहे. ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. मात्र ट्रेलर लॉन्च झाल्यापासून हा चित्रपट वादात अडकला असून सोशल मीडियावर #BoycottBrahmastra होतोय. यामागे नक्की काय कारण आहे हे आपण जाणून घेऊया.
‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचा चित्तथरारक ट्रेलर काल सकाळी लॉन्च करण्यात आला. मात्र ट्रेलर लॉन्चिंगला अवघे काही तास उलटत नाही तोपर्यंत या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचीही मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावर #BoycottBrahmastra ट्रेंड होत आहे. एकीकडे हा चित्रपट हॉलिवूडमधील चित्रपटांची कॉपी असल्याचा आरोप होत असून दुसरीकडे बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाल्याने निर्मात्यांची धाकधुक वाढली आहे.
ट्रेलरमधील एका दृष्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. रणबीर कपूर मंदिरामध्ये बूट घालून जातो आणि घंटा वाजवतो हे अनेकांना आवडलेले नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नेटकऱ्यांनी बॉलिवूडचा उल्लेख ‘उर्दुवूड’ असा केला आहे. ‘सनातन धर्माचा अपमान करण्याची संधी बॉलिवूड कधी सोडत नाही’, असा आरोप एका युजरने केला आहे. तर अन्य एका युजरने ‘हाच दाक्षिणात्य चित्रपट आणि हिंदी चित्रपटातील फरक असून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिंदु संस्कृतीची सन्मान होतो’, असे म्हटले.
Why he Is entering Temple with shoes #BoycottBrahmastra pic.twitter.com/YJGyauTD1z
— Shashikanth Reddy (@Shashi26214076) June 15, 2022
ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये रणबीर कपूर ‘शिवा’ नावाच्या तरुणाच्या भूमिकेमध्ये दिसणार असून आलिया भट्ट ‘ईशा’ नावाच्या तरुणीची भूमिका साकारणार आहे. या दोघांची लव्हस्टोरीही या चित्रपटात दाखवली जाणार आहे. पौराणिक आणि विज्ञानकथेचा मिलाफ या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

ट्रेलरमध्ये अस्त्रांची देवता असा ब्रह्मास्त्रचा उल्लेख करण्यात आला आहे. रणबीर कपूर हा ‘अग्नी’चे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आहे. पहिल्या तासातच तब्बल 1.1 मिलियन लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. रणबीर-आलियाची केमेस्ट्री लोकांना आवडली असून लग्नानंतर हे दोघे पहिल्यांदाच चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. अयान मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होईल. रणबीर आणि आलियासह या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.




























































