
क्षुल्लक कारणावरून प्रियकराने कोयत्याने वार करून प्रेयसीची हत्या केली आणि स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार सुधागड तालुक्यातील परळी येथील राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होममध्ये घडला. मृत तरुणीही याच दवाखान्यात नर्स म्हणून काम करत होती. पौर्णिमा देसाई आणि शेखर दुधाणे अशी दोघांची नावे आहेत. या घटनेची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकारामुळे संपूर्ण शहर हादरले आहे.
सुधागड तालुक्यातील परळी येथे राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होम दवाखाना आहे. या दवाखान्यात देसाईपाडा येथे राहणारी पौर्णिमा देसाई ही नर्स म्हणून काम करत होती. तिचे दुधाणेवाडी येथे राहणाऱ्या शेखर दुधाणे याच्यासोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. या वादातून मंगळवारी सायंकाळी शेखरने दवाखाना गाठला आणि पौर्णिमाच्या गळ्यावर कोयत्याने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पौर्णिमाचा मृत्यू झाल्याचे समजताच शेखरनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच जांभूळपाडा, पाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
अनेक दिवसांपासून ‘ती’ टाळत होती
शेखरने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. पोलिसांना ती नोट सापडली. त्यात त्याने असे लिहिले होती की, पौर्णिमा आणि माझे प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती मला टाळत होती. याच रागातून मी टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.