जनहितासाठी बीपीसीएलच्या खासगीकरणाचा सरकारने फेरविचार करावा, शिवसेनेची लोकसभेत आग्रही मागणी

395

राष्ट्रीय सुरक्षा आणि व्यापक जनहितासाठी बीपीसीएलच्या खासगीकरणाचा सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी शिवसेनेने लोकसभेत केली. जगभरातील मोठय़ा 500 कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱया महारत्न दर्जा कंपनीने मिळवला असून कंपनीचे खासगीकरण झाल्यास पेट्रोलियम क्षेत्रातील सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होईल ही बाबही या वेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

खासगीकरणामुळे निर्माण होणाऱया संभाव्य धोक्यांची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली. बीपीसीएल कंपनीने देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. कंपनीने 1976पासून देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पेट्रोलियम क्षेत्रातील देशाची गरज भागवण्याबरोबरच प्रधान मंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, पहल, स्कील इंडिया, मेक इन इंडिया यांसारख्या देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये बीपीसीएलचे मोठे योजदान आहे. तसेच महापूर, भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सीएसआर फंडाच्या माध्यमातून कंपनीने उल्लेखनीय काम केल्याचेही शेवाळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

अधिकाऱ्यांकडून पुनर्विकासाला ब्रेक 

राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि संरक्षण खात्यातील अधिकाऱयांचा आम्ही आदर करतो. परंतु राष्ट्रीय सुरक्षेची सबब सांगून काही अधिकारी, संरक्षण खात्याच्या आस्थापनांच्या आजूबाजूच्या परिसराच्या पुनर्विकासाला ब्रेक लावत असल्याचा आरोपही शेवाळे यांनी केला. संरक्षण खात्याच्या मुंबईतील आस्थापनांच्या जवळील परिसराच्या पुनर्विकासाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळला आहे. या परिसरातील गावठाणे आणि इतर जर्जर इमारतींचा पुनर्विकास रखडल्याने हजारो कुटुंबे मुठीत जीव घेऊन जगत आहेत. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 2016 साली संरक्षण खात्याच्या वतीने एक परिपत्रक जारी करण्यात आले. परंतु अद्याप या परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटला नसल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

बीएसएनएल, एमटीएनएल कर्मचाऱयांना त्वरित वेतन द्या! 

गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएल, एमटीएनएल या सार्वजनिक उपक्रमांतील कंपन्यांमधील कर्मचाऱयांचे थकलेले वेतन त्वरित देण्याची मागणीही शेवाळे यांनी या वेळी केली. गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन तसेच कोणत्याही प्रकारचा बोनस देण्यात आलेला नाही. अनेक कुटुंबांमध्ये केवळ एकच कमावती व्यक्ति आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले. सार्वजनिक उपक्रमांच्या या अवस्थेमुळे सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सेंट्रल बँक नोकर भरतीतील महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांवरील अन्यायाची चौकशी करा -शिवसेना

 राष्ट्रीयीकृत सेंट्रल बँक ऑफ इंडियाने संपूर्ण देशभरात सर्व वृत्तपत्रांत जाहिराती देऊन शिपाई , सहशिपाई आणि कर्मचारी पदांवरील नोकरभरती केली. पण जानेवारी आणि फेब्रुवारी 2013 मध्ये केलेल्या कामगार भरतीत मुंबईतील उमेदवारांना कोणतेही कारण न देता डावलले व त्यांची नियुक्ती रद्द केली आहे. भरती प्रक्रियेतील या अन्यायाची आणि भ्रष्टाचाराची केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कसून चौकशी करावी आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांवरील अन्याय दूर करावा, अशी आग्रही मागणी खासदार, शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहरातील चर्चेत केली.सेंट्रल बँकेच्या नोकरभरतीत मुंबई आणि महाराष्ट्रातील उमेदवारांवर झालेल्या अन्यायाची चौकशी अर्थ मंत्रालयाने करावी आणि या भरती प्रक्रियेत गोलमाल करीत मराठी उमेदवारांवर अन्याय करणाऱया भ्रष्ट अधिकाऱयांवर कारवाई करावी. अन्याय झालेल्या भूमिपुत्रांना तत्काळ नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी खासदार कीर्तिकर यांनी केली आहे.

सरकारी कंपन्यांचे खासगीकरण हा मोठा घोटाळाच- काँग्रेस

भारत पेट्रोलियमसह (बीपीसीएल) पाच बडय़ा सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे गुरुवारी लोकसभेत तीक्र पडसाद उमटले. काँग्रेसने या निर्णयाला कडाडून विरोध केला. हा मोठा घोटाळा आहे. देशाची लूट केली जातेय, असा घणाघाती आरोप काँगेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला.बीपीसीएल, शिपिंग कॉर्पोरेशनसह पाच बडय़ा सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाला केंद्र सरकारने बुधवारी मंजुरी दिली. सरकार या कंपन्यांतील आपला हिस्सा विकणार आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेसने गुरुवारी लोकसभेत निदर्शने केली. काँग्रेस सदस्यांनी जवळपास 15 मिनिटे सरकारविरोधात घोषणा सुरू ठेवल्या.

संसदीय कार्यमंत्र्यांनी आरोपांचे केले खंडन

खासगीकरणाच्या मुद्दय़ावरून काँग्रेसने हंगामा करताच संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात स्वच्छ सरकार चालवत आहेत. सरकारमध्ये भ्रष्टाचाराला कुठेही थारा नाही, असे स्पष्टीकरण जोशी यांनी दिले. त्यानंतरही काँग्रेस सदस्यांनी जोशी यांच्यावर विविध प्रश्नांचा भडीमार केला. अखेर अध्यक्षांच्या हमीनंतर काँग्रेस सदस्य शांत झाले.

आपली प्रतिक्रिया द्या