ब्रॅडमन यांचं रनतांडव आणि आजचा इंग्लंड

1936-37ची ऍशेस म्हणजे क्रिकेटच्या इतिहासातला ‘भूकंप’च होता. पहिल्या दोन कसोटीत ऑस्ट्रेलिया असा काही ढेपाळला होता की राखेत गडप झाल्यासारखाच वाटला. ऍशेस ऑस्ट्रेलिया हरणार हे निश्चित होते. तेव्हा नेमका त्याच राखेतून उडाला एक फिनिक्स. तो म्हणजे डॉन ब्रॅडमन! पुढच्या तीन कसोटीत त्यांनी फलंदाजी नव्हे, भविष्य लिहिलं. 13, 270, 26, 212, 169 या आकडय़ांत धावा नाहीत; धग आहे. मैदानावर त्याची बॅट पडत नव्हती, ती इतिहासावर घाव घालत होती. इंग्लंडचे गोलंदाज आले, गेले, बदलले पण विकेट्स मात्र इंग्लिशच. ऑस्ट्रेलियाने 0-2 वरून मालिका 3-2 ने जिंकली आणि कसोटी क्रिकेटमध्ये एक अद्भूत पराक्रम केला.

150 वर्षांच्या कसोटी इतिहासात हा चमत्कार आजवर कुणालाही परत करता आलेला नाही. आता इंग्लंडवरही तेच संकट आहे. फरक इतकाच आहे की तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे ब्रॅडमन होता. आज इंग्लंडकडे इतिहासाचा भार आहे. त्यांना राखेतून उडायचं असेल, तर फिनिक्सपक्षी होऊन त्यांना पुन्हा पेटून उठावे लागेल.

बॅझबॉल या आक्रमक खेळाचे जनक असलेल्या इंग्लंडला आता धावांची नव्हे, ब्रॅडमन यांच्या धाडसाची गरज आहे. अन्यथा पुन्हा एकदा ऍशेस ऑस्ट्रेलियाकडे राहणार हे निश्चित. ऍडलेड  कसोटीत त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल.