
पदवी प्रदान, क्रीडा स्पर्धा, वार्षिक संमेलन आदी नियमित कार्यक्रमांत जी-20 परिषदेचे ब्रँडिंग करण्याच्या सूचना यूजीसीने देशातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक कार्यक्रमात जी-20 परिषदेचे बोधचिन्ह असलेले फलक लावणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे.
जी-20 परिषदेच्या दोनशे बैठका देशभरातील 56 शहरांमध्ये होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जी-20 परिषद प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी ‘युनिव्हर्सिटी कनेक्ट’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात जी-20च्या विषयाशी संबंधित मॅरेथॉन, सायकल मॅरेथॉन, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा, इन्स्टा रील आदी स्पर्धा शिक्षण संस्था, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जातील. स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. त्यातील स्वयंसेवकांना जी-20चे बोधचिन्ह असलेले टी शर्ट, टोपी, रिस्ट बँड द्यावेत. रिसोर्स ऍण्ड इन्फर्मेशन सेंटर फॉर डेव्हलपिंग कंट्रीजतर्फे (आरआयसीडीसी) 75 विद्यापीठांमध्ये चर्चासत्र आयोजित केले जाणार असल्याचे नमूद केले आहे.
विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांचे पदवीप्रदान कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, वार्षिक संमेलन आदी कार्यक्रमांत जी-20 परिषदेचे ब्रँडिंग करावे. प्रत्येक कार्यक्रमात जी-20 परिषदेचे बोधचिन्ह असलेले फलक लावणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यूजीसीकडून जी-20चे बोधचिन्ह, फलकाचे डिझाईनही उपलब्ध करून देण्यात आले आहे.



























































