
सामना ऑनलाईन । रिओ दी जेनेरिओ
आंतरराष्ट्रीय स्तरावरील बलाढय़ संघ म्हणून ओळखल्या जाणाऱया ब्राझीलच्या फुटबॉल संघाने सोमवारी पहाटे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर अगदी दिमाखात मोहोर उमटवली. ब्राझीलने जेतेपदाच्या लढतीत पेरूचे आव्हान 3-1 अशा फरकाने परतवून लावत नवव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. 2007 सालानंतर ब्राझीलने ही स्पर्धा जिंकताना स्टेडियममध्ये उपस्थित फुटबॉलप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. एव्हर्टन, गॅब्रियल जेसस व रिचरलिसन यांनी दमदार गोल करून ब्राझीलच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. गॅब्रियल जेससला मिळालेले दोन यलो कार्ड व स्टार खेळाडू नेमारची दुखापतीमुळे अनुपस्थितीत असूनही ब्राझीलने विजेतेपदाचा करंडक पटकावला हे विशेष.
एव्हर्टनने 15 व्या मिनिटाला गोल करीत ब्राझीलला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 44 व्या मिनिटाला गुरेरोने पेनल्टीवर गोल करीत पेरूला पूर्वार्धात 1-1 अशी बरोबरी साधून दिली. 48व्या मिनिटाला गॅब्रियल जेससने ब्राझीलसाठी दुसरा गोल केला. उत्तरार्धात 90 व्या मिनिटाला रिचरलिसन याने ब्राझीलसाठी तिसरा गोल करीत संघाला जेतेपद मिळवून दिले.























































