
पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात गेल्या वर्षभरात दोन पेंग्विन आणि एका वाघिणीचा जन्म झाल्याने आता प्राणी-पक्ष्यांच्या ‘ब्रीडिंग’ उपक्रमाला गती मिळाली आहे. आगामी काळात तरस, कोल्हा, अस्वल, लांडगा अशा प्राण्यांसह विविध पक्ष्यांचेही ब्रिडिंग करण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या वर्षी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात ब्रीडिंग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
पालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात गेल्या काही वर्षांत अनेक नवे प्राणी-पक्षी आणले गेल्याने पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. उद्यानात सद्यस्थितीत वाघ, बिबटय़ा, तरस, अस्वल, हत्ती, अजगर, 100 प्रकारचे पक्षी असे 13 जातीचे सस्तन प्राणी, 19 जातींचे 157 पक्षी, 7 जातीचे उभयचर, सरपटणारे प्राणी आहेत. तर आगामी काळात या ठिकाणी पांढरे सिंह, झेब्रा असे प्राणी आणले जाणार आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत या प्राण्यांसाठी पिंजरे, नैसर्गिक अधिवास तयार करण्याचे कामही वेगाने सुरू आहे.
कक्षात 25 पेंग्विनच्या व्यवस्थेची क्षमता
उद्यानात 2017 मध्ये पेंग्विन आणल्यानंतर दोन पेंग्विनचा जन्म झाल्याने सद्यस्थितीत पेंग्विनची संख्या 9वर पोहोचली आहे. या पेंग्विन कक्षाची क्षमता 25 पेंग्विनची व्यवस्था होईल इतकी आहे. त्यामुळे आगामी काळात ब्रीडिंगमुळे पेंग्विनची संख्या 15 पर्यंत गेल्यानंतर इतर प्राणिसंग्रहालयांना पेंग्विन देण्याबाबत विचार करता येईल, अशी माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
n सद्यस्थितीत असणाऱया वाघ, अस्वल, कोल्हा, लांडगा, तरस, हरणे, यांच्यासह दुर्मिळ पाणी-पक्षीही आहेत. या प्राणी-पक्ष्यांच्या ब्रीडिंगला गती देण्यासाठी छोटे धबधबे, निवासस्थाने, झाडे, आहाराची व्यवस्था, सहाय्यक उपचार साकारण्यात येणार आहेत. यासाठी डॉक्टरांच्या टीमसह कर्मचारी विशेष लक्ष ठेवून काम करीत आहेत.
– उद्यानात प्राणी-पक्ष्यांच्या ब्रीडिंगमुळे त्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे हे वाढीव प्राणी-पक्षी इतर प्राणिसंग्रहालयांना, राज्यांना देण्यात येतील व त्या बदल्यात उद्यानात नसलेले इतर पक्षी घेता येणार असल्याचे
डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.





























































