
नवरदेवाला बे एके बे, बे दुणे चार… असा पाढा म्हणता येत नाही, म्हणून लग्न मोडल्याची आश्चर्यकारक घटना नुकतीच उत्तर प्रदेशातील महोबा जिह्यात घडली. वरमाला घालण्यापूर्वी वधूला अचानक माहिती मिळाली की, नवरदेव अशिक्षित आहे. त्याची खात्री करण्यासाठी वधूने चक्क त्याला ‘बे’चा पाढा म्हणायला सांगितले. जर पाढा म्हटला तर लग्न करेन, असे सांगितले.
मात्र नवरदेवाला पाढा काही म्हणता आला नाही. त्यामुळे पुढे जाऊन आयुष्याची सगळी गणितं चुकण्याआधी वधूने लग्न मोडायचे पाऊल उचलले. ही बातमी वाऱयासारखी वऱहाडी मंडळीत पसरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. खूप जणांनी समजूत घालूनही तरुणीने लग्न करण्यास नकार दिला.
वरमाला घालेपर्यंत लग्न मंडपात सगळी परिस्थिती ठीक होती. मात्र अचानक मंडपातील वातावरणच बिघडले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलिसांना बोलावण्यात आले. या प्रकरणी पानवाडी पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूच्या कुटुंबियांनी एकमेकांना दिलेले दागिने आणि रक्कम परत करण्यास सांगितले. वधु-वराकडील मंडळींनी सगळे सामंजस्याने घेतले.
मुलाच्या घरच्यांनी जेवण व इतर गोष्टींवर खर्च झालेले चार लाख रुपये देण्याचे मान्य केले. मुलीचा निर्णय स्वीकारून हे लग्न झाले नाही. हे सारे घडले त्या ‘बे’च्या एका पाढय़ामुळे!




























































