
सामना ऑनलाईन । रांची
लग्नानंतर सासरी जात असताना नवरीच्या प्रियकराने त्याच्या मित्रांच्या मदतीने नववधूला पळवून नेले. झारखंडची राजधानी धुर्वा पोलीस स्थानक भागामध्ये ही घटना घडली आहे. ‘झी न्यूज‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, येथे एका जोडप्याचे वाजतगाजत लग्न पार पडले. लग्नानंतर नवरीची पाठवणी करण्यात आली. परंतु सासरी जात असतानाच प्रियकराने संधी साधली आणि नवरीला पळवून नेले. याकामी त्याला त्याच्या मित्रांनी मदत केली. तसेच यावेळी नवरा मुलगा आणि कुटुंबीयांना मारहाणही झाली. हा सर्व प्रकार नवरीच्या संमतीने झाल्याचे उघड झाले आहे.
याबाबत नवऱ्याने माहिती देताना सांगितले की, पाठवणीचा कार्यक्रम झाल्यानंतर गाडीतून खूंटी येथे निघालो होतो. त्यावेळी धुर्वा भागात नवरीच्या प्रियकराने गाडी थांबवली आणि नवरी गाडीतून उतरुन प्रियकराच्या दुचाकीवर बसून फरार झाली. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. चौकशीत मुलीने प्रियकरासोबत मिळून हा प्लान केल्याचे उघड झाले. मुलीने आणि प्रियकराने पोलिसात शरणागती पत्करली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
























































