लेख – तिबेटी युवकांची चिनी सैन्यामध्ये भरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दलाई लामांचा तिबेटी जनतेवर फार मोठा प्रभाव आहे. ही जनता त्यांना देवासमान मानते. त्यामुळे तिबेटी युवक, जे आज चिनी सैन्यामध्ये सामील होणार आहेत, त्यांची निष्ठा ही चीनकडे असेल की दलाई लामांकडे? आपण त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करून त्यांना हिंदुस्थानच्या बाजूने काम करण्याकरिता तयार करू शकतो का? तिबेटी युवकांची चिनी सैन्यामध्ये भरती ही हिंदुस्थानकरिता एक मोठीच संधी आहे आणि गरज पडली तर ते नक्कीच हिंदुस्थानच्या बाजूने काम करू शकतील. भरती झालेल्या तिबेटी युवकांना आपल्या बाजूने फिरवता आले तर चीनला शह देण्याकरिता युद्धजन्य परिस्थिती, युद्धामध्ये आपल्याला एक महत्त्वाचे साधन मिळेल.

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या, ज्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. चीनला असे वाटत होते की, अमेरिका अफगाणिस्तानमधून परत गेल्यानंतर तिथे चीनला अमेरिकेची जागा घेता येईल आणि तिथल्या नैसर्गिक संपत्तीवर डल्ला मारता येईल, परंतु तसे होताना दिसत नाही. असे समोर येत आहे की, चीन अफगाणिस्तानमधल्या दलदलीमध्ये अडकत आहे.

दक्षिण चीन समुद्रामध्ये आपले प्रभावक्षेत्र वाढवण्याकरिता चीनने समुद्रात अनेक खडकांवर कृत्रिम बेटे बांधली आहे. चीनने हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेली कृत्रिम बेटे आता बुडत आहेत आणि हजारो कोटी रुपयांची या बेटांवर केलेली गुंतवणूक अक्षरशः समुद्राच्या पाण्यात जात आहे. या सगळ्या घटना चिनी अर्थव्यवस्थेचा वेग कमी करत आहेत, जी हिंदुस्थानकरिता चीनच्या बरोबर पोहोचण्याकरता एक मोठी संधी आहे.

अमेरिका आणि हिंदुस्थानने चीनच्या विरोधात बनवलेल्या ‘क्वॉड’ला प्रत्युत्तर म्हणून चीन आपल्या मित्रराष्ट्रांचा क्वॉड बनवत आहे, ज्यामध्ये नॉर्थ कोरिया, इराण आणि पाकिस्तान यांचा सहभाग असेल. अर्थात हे देश बदमाष राष्ट्रे, रोग नेशन्स (rogue) म्हणून ओळखली जातात आणि या राष्ट्रांची एक फळी उभारण्यामध्ये चीनला फारसे यश मिळताना दिसत नाही. याउलट जपान इंडो-पॅसिफिकमधल्या लहान देशांना आणि दक्षिण-पूर्वेतील देशांना एकत्रित करून दक्षिण चीन समुद्र, पूर्व चीन समुद्र आणि तैवानच्या खाडीमध्ये चिनी विरोधामध्ये तिथल्या राष्ट्रांची फळी निर्माण करत आहे. हिंदुस्थानच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची घटना आहे.

आज चीनसमोर सर्वात गंभीर समस्या आहे ती हिंदुस्थान आणि चीन सीमेवरील अतिथंड भागांमध्ये तैनात करण्याकरिता चिनी सैनिकांची असलेली कमतरता. आता बातमी आली आहे की, चिनी सरकारने तिबेटमधल्या प्रत्येक कुटुंबाला आदेश दिला आहे, कुटुंबातील एक युवक कम्पल्सरी चिनी सैन्यामध्ये सामील होईल आणि त्याला हिंदुस्थान-चिनी सीमेवर तैनात केले जाईल. अर्थातच हा सैनिक आणि प्रत्येक कुटुंब चिनी कम्युनिस्ट पार्टीचे मेंबर असतील. याआधी चिनी सैन्यामध्ये हन चायनीज असायचे, परंतु या हन चायनीजची अतिथंड, अतिदुर्गम भागांमध्ये काम करण्याची मानसिकता नाही आणि शारीरिक क्षमता पण नाही. येथे चिनी सैनिक मोठय़ा प्रमाणामध्ये आजारी पडत आहेत आणि दर दहा दिवसांनी या भागामध्ये असलेल्या सैनिकांची चीन बदली करत आहे. कारण त्याहून जास्त वेळ ते या भागात टिकू शकत नाहीत. तुलनेमध्ये हिंदुस्थानी सैनिक लडाख सीमेवर दोन वर्षे काम करतात, परंतु चिनी सैनिकांची मात्र दहा दिवसांनंतर बदली केली जाते.

तिबेटी युवकांना चिनी सैन्यामध्ये भरती केले तर त्याचा हिंदुस्थानवर नेमका काय परिणाम होऊ शकतो? आज तिबेटची लोकसंख्या ही पन्नास लाखांच्या आसपास आहे आणि बहुतेक तिबेटी जनतेला चीनमध्ये राहण्याची इच्छा नाही. चीनने तिबेटवर केलेली सांस्कृतिक, आर्थिक आणि इतर विविध प्रकारची आक्रमणे, याशिवाय तिथल्या प्रत्येक नागरिकावर ठेवलेले लक्ष यामुळे तिबेटी जनतेला चीनविषयी खूपच राग आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःहून कोणीही तिबेटी नागरिक चिनी सैन्यामध्ये सामील होणार नाही. म्हणूनच चिनी सरकारला त्यांना कम्पल्सरी भरती होण्याचा आदेश द्यावा लागला आहे. प्रथम त्यांना बॉर्डर गार्डमध्ये भरती केले जाईल आणि नंतर त्यांना चिनी सैन्यामध्ये भरती केले जाईल.

हिंदुस्थानी सैन्यामध्ये स्पेशल फ्रंटिअर फोर्स हा तिबेटी युवकांचा एक कमांडो फोर्स तयार आहे आणि या कमांडोंनी हिंदुस्थानच्या सुरक्षेमध्ये दिलेल्या योगदानाविषयी मी पूर्वी लिहिलेले आहे. 2020 मध्ये कैलास पर्वतरांगांवर अचानक जाऊन स्पेशल फ्रंटिअर फोर्सने चीनवर कुरघोडी केली होती. हे तिबेटी याच भागातले असल्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता आणि या अतिथंड भागात राहण्याची क्षमता ही लक्षणीय असते. त्यामुळेच चिनी नागरिकांऐवजी तिबेटी युवकांना तैनात करण्याचे चीनचे नियोजन आहे. ते चिनी सैन्याकरिता किती उपयुक्त ठरू शकेल हे येणारा काळच सांगेल. मात्र हे नक्की आहे की, हन चायनीज या भागात येण्याकरिता तयार नसल्यामुळे चीनला अशा उपाययोजना कराव्या लागत आहेत.

याशिवाय ही पण बातमी आली होती की, नेपाळ सरकारच्या मदतीने नेपाळी गुरखा जवानांनासुद्धा चीन आपल्या सैन्यामध्ये सामील करू शकतो, परंतु केवळ पैशांकरिता चिनी सैन्यामध्ये आलेले तिबेटी आणि गुरखा युवक खरोखरच कठीण परिस्थितीमध्ये चीनच्या बाजूने काम करतील का?

मागच्या आठवडय़ामध्ये चीनचे राष्ट्रपती जिन पिंग यांनी अचानक न सांगता हिंदुस्थान-तिबेट सीमेवरील गावांना भेट दिली. गेल्या तीस वर्षांमध्ये कुठल्याही चिनी पंतप्रधानांची ही तिबेटला दिलेली पहिली भेट होती. असे अचानक का करण्यात आले? विश्लेषकांचे असे म्हणणे आहे की, तिबेटी जनतेचे लक्ष दलाई लामांच्या वाढदिवसाऐवजी चिनी पंतप्रधानांच्या भेटीकडे वळविण्याकरिता हा कार्यक्रम आयोजित केला असावा.

दलाई लामांचा तिबेटी जनतेवर फार मोठा प्रभाव आहे. ही जनता त्यांना देवासमान मानते. त्यामुळे तिबेटी युवक, जे आज चिनी सैन्यामध्ये सामील होणार आहेत, त्यांची निष्ठा ही चीनकडे असेल की दलाई लामांकडे? आपण त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करून त्यांना हिंदुस्थानच्या बाजूने काम करण्याकरिता तयार करू शकतो का? तिबेटी युवकांची चिनी सैन्यामध्ये भरती ही हिंदुस्थानकरिता एक मोठीच संधी आहे आणि गरज पडली तर ते नक्कीच हिंदुस्थानच्या बाजूने काम करू शकतील. भरती झालेल्या तिबेटी युवकांना आपल्या बाजूने फिरवता आले तर चीनला शह देण्याकरिता युद्धजन्य परिस्थिती, युद्धामध्ये आपल्याला एक महत्त्वाचे साधन मिळेल.